Jalgaon Flood : वीज गायब, घरं पाण्याखाली, शेतात चिखल; जळगावात पावसाचा कहर, सद्यस्थिती काय?
जळगावच्या चाळीसगावात नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने मोठे संकट उभे राहिले आहे. जळगावातील चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. जळगावात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने डोंगरी आणि तितुर या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या महापुरामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. हिरापूर रोडवरील बेतमुथा कॉम्प्लेक्समधील तब्बल ९ दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेली. तर धुळे रोड परिसरातील आदर्श कॉलनीसह अनेक नागरिकांच्या घरात व व्यापारी संकुलात पाणी शिरले. यामुळे व्यापारी आणि दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यावर नगरपरिषदेकडून दुकानांतील पाणी बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
मुसळधार पावसामुळे नदीला रौद्ररूप
जळगावच्या चाळीसगावात नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. रात्रीपासून शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच पाटणादेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगमस्थानावर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला रौद्ररूप प्राप्त झाले आहे. या महापुरामुळे ऐन नवरात्र उत्सवात चंडिका देवीचे पुरातन मंदिर तात्पुरते दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार पुराचा सायरन वाजवून सतर्क केले जात आहे.
दुसरीकडे, एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली परिसरात अतिवृष्टीमुळे शेतात तब्बल एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. यामुळे मोसंबी, मका आणि कपाशीसह काढणीवर आलेल्या इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याचे कणीस तुटून पडले आहेत. तसेच मोसंबीची फळे गळून जमिनीवर पडली आहेत. या भीषण नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी त्वरित पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी आणि या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
या नैसर्गिक संकटात चाळीसगाव शहरातील अनेक भागांमध्ये स्थानिक तरुणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. विशेषतः धुळे रोड परिसर आणि नदीकाठच्या सखल भागांत घरात अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांना सुरक्षित बाहेर त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. जळगावात संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
