‘कानून के हाथ लंबे होते हैं’, नाशिक पोलिसांची जळगावात जावून मोठी कारवाई, जुगारांचे धाबे दणाणले
'कानून के हाथ लंबे होते हैं', असं आपण ऐकलं आहे. विशेष म्हणजे ते खरं देखील आहे. कारण नाशिक येथील पोलिसांच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरात येवून जुगारांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यामुळे जुगारांचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना आणि इतर गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण असं असताना पोलिसांनी आपलं काम सुरु ठेवलं आहे. पोलीस आपल्या परीने चुकीचं किंवा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवत आहेत. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नियुक्त केलेल्या टीमने जळगावच्या एरंडोल तालुक्यात घुसून जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जळगावच्या एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग लगत एका हॉटेल जवळ सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 1 लाख 31 हजार 140 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरात 6 पत्त्यांचे क्लब, पण एकावरच कारवाई?
जळगावच्या एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मयुरी गार्डन जवळ सुरु असलेल्या जुगाराच्या क्लबवर नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाने धाड टाकली. या धाडीत सुमारे 1 लाख 31 हजार 140 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान शहरात सहा पत्त्यांचे क्लब बिनधास्तपणे सुरु असतांना केवळ एका क्लबवर कारवाई करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
पोलिसांनी कारवाई कशी केली?
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हॉटेल मयुरी गार्डन येथे पत्त्यांचा क्लब सुरु असल्याची गुप्त माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयास प्राप्त झाली होती. पत्त्यांच्या क्लबबाबत माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास क्लबवर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत 1 लाख 31 हजार 140 रुपये रोख रकमेसह मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस पथकाने धाड टाकताच अन्य काही जण भिंतीवरून उड्या मारून फरार झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.