जालन्यात नराधम टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण, तरुणीचा विनयभंग

जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरात बुलडाणा जिल्ह्यातील प्रेमी युगुल फिरायला आले असताना चौघांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली

जालन्यात नराधम टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण, तरुणीचा विनयभंग

जालना : जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तरुणीचा विनयभंग करतानाचा व्हिडीओ गावगुंडांनी शूट केला आणि सोशल मीडियावर वायरल केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार (Jalna Couple Beaten Up by Goons) उघडकीस आला आहे.

जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरातील ही घटना असल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तरुण आणि तरुणी गोंदेगावात फिरायला आले होते. यावेळी तळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना टोळक्याने गाठलं आणि धमकावायला सुरुवात केली.

‘आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तळं असल्यामुळे आम्ही फिरायला आलो’ असं तरुण काकुळतीला येऊन चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हाता-पाया पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र मस्तवाल तरुणांनी तरुणीच्या वडिलांना फोन करण्यास सांगितलं.

संपूर्ण व्हिडीओमध्ये गावगुंड तरुणीची कॉलर पकडून तिला फरपटत नेताना दिसत आहे. तरुण सारखं ‘दादा, तिला सोडा, आम्ही परत येणार नाही’ अशा शब्दात गयावया करत आहे. तरुणाने आपल्या भावाला फोन लावून बोलवून घेण्याचीही विनंती केल्याचं व्हिडीओत दिसतं.

प्रेमी युगुलाला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध आणि चीड व्यक्त होत आहे. ही घटना नेमकी कधी घडली, हे अद्याप समजलेलं नाही. व्हिडीओ अर्धवट असल्यामुळे पीडित तरुणी आणि तरुण कुठे आहेत, याविषयीही समजलेलं नाही.

दरम्यान, प्रेमी युगुलाला मारहाण करणाऱ्या दोन-तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत (Jalna Couple Beaten Up by Goons) आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *