जायकवाडी 98.23 टक्के भरलं, धरणाखालील भागात सतर्कतेचा इशारा

डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणाखालील (Jayakwadi dam water level) भागातील नागरिकांनी सतर्क रहावं, नदीच्या पात्रात जाऊ नये, असं आवाहन पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांनी केलं आहे.

जायकवाडी 98.23 टक्के भरलं, धरणाखालील भागात सतर्कतेचा इशारा

औरंगाबाद : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं जायकवाडी धरण 98 टक्क्यांपेक्षा जास्त (Jayakwadi dam water level) भरलं आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासूनच पैठण जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मिती करुन एकूण 1589 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलंय. शिवाय डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणाखालील (Jayakwadi dam water level) भागातील नागरिकांनी सतर्क रहावं, नदीच्या पात्रात जाऊ नये, असं आवाहन पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांनी केलं आहे.

रात्री येणारी पाण्याची आवक विचारात घेवून सकाळी 6 वाजताच्या आसपास किंवा पहाटे धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क रहावं. नदीपात्रात कोणीही उतरू नये, वाहने , जनावरे पात्रात सोडू नयेत. कोणतीही जीवित/ वित्त हाणी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलंय.

जायकवाडी धरणात शनिवारी सायंकाळी 6 वाजता 18273 क्युसेकने आवक सुरु होती. त्यामुळे लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.

60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

नाथसागरावर अवलंबून क्षेत्र

नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं.

जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे.

जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.

औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.

मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा कायम

जायकवाडी भरलं म्हणजे मराठवाड्यातील एका महत्त्वाच्या क्षेत्राचा पाणीप्रश्न मिटतो. पण यामुळे संपूर्ण मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला असं म्हणता येणार नाही. लातूर, उस्मानाबाद आणि बीड यांसारखे जिल्हे अजूनही प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मराठवाड्याला आता परतीच्या पावसाकडून अपेक्षा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *