मोठी बातमी! ठाकरे आणि मनसे युतीचा फॉर्म्युला ठरला, कल्याण डोंबिवलीत युती होणारच… 122 पैकी…
आगामी महापालिका निवडणुकीत मोठे बदल होताना दिसत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असून त्यांनी युतीची घोषणा केली. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट राज्यातील महापालिका निवडणुका एकत्र लढवणार आहेत.

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून 122 जागांपैकी 54 जागांवर मनसे तर 68 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार आहे. या संदर्भात बोलताना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितले की, कल्याणमधील राजकीय परिस्थिती लक्षात घेता मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. वाटाघाटी अत्यंत सकारात्मक पद्धतीने पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही मनोमिलन झाले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली.
मनसेकडून ज्या जागांची मागणी करण्यात आली होती, त्या जागा शिवसेनेच्या वतीने सोडण्यात आल्या असून काही जागांबाबत ठाकरे गटानेही आग्रह धरला, त्या जागा मनसेने सोडल्याचे सांगण्यात आले. मनसे नेते राजू पाटील यांनी 122 पैकी 54 जागांची मागणी केली होती. त्यामध्ये कल्याण पश्चिमेतील 12 ते 13 जागांवर मनसे उमेदवार रिंगणात असतील, तर उर्वरित जागांवर ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर कोणताही पक्ष चर्चेसाठी पुढे आला तर त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. मात्र, सध्या कोणत्याही पक्षासोबत अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी महायुतीवरही जोरदार टीका करण्यात आली. भाजप–शिवसेना महायुती ही स्वतःच्या ओझ्याने पडणार असल्याचा दावा करत, पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग केलेल्या लोकांना कसा न्याय दिला जाणार, हे महाराष्ट्र पाहील, असा टोला लगावण्यात आला.
महानगरपालिकेत जास्तीत जास्त जागा मिळवणे हे उद्दिष्ट असून, युतीच्या पॅनेलमध्ये सक्षम उमेदवार मिळाल्यास त्यांना संधी देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शंभर टक्के जागावाटप पूर्ण झाले असून दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचे नेत्यांनी सांगितले आहे. आता कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि अजित पवारांच्या NCP मध्ये युती होते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
