आधी देवाचे दर्शन मग दानपेटीवरच डल्ला… देवाच्या दारातच भयंकर प्रकार, CCTV पाहून विश्वास बसणार नाही
कल्याणमधील गांधारी येथील हनुमान मंदिरात दिवसाढवळ्या धक्कादायक चोरी घडली. एका चोरट्याने देवाला हात जोडून, दर्शन घेतल्यानंतर दानपेटी फोडून रक्कम पळवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Kalyan Temple Theft : कल्याण परिसरातील गांधारी गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिरामध्ये भरदिवसा चोरीचा एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात चोरट्याने चोरी करण्यापूर्वी चक्क हनुमानाला हात जोडले आणि त्यानंतर लगेच मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सर्व रक्कम घेऊन पोबारा केला. या चोरट्याची ही संपूर्ण कृती मंदिराच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याणमधील गांधारी येथील हनुमान मंदिरात दिवसाढवळ्या घडली. या मंदिरात शिरलेला हा अज्ञात इसम सुरुवातीला अगदी एका भाविक आणि श्रद्धाळूप्रमाणे मंदिरात वावरला. त्याने शांतपणे देवाच्या मूर्तीसमोर उभे राहून हात जोडले. त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि मनोभावे दर्शन घेतले. मात्र दर्शन घेतल्यानंतर लगेचच त्याने आपले खरे रूप दाखवले.
मंदिरात कोणी नाही ही संधी साधून त्याने त्वरित आपला मोर्चा दानपेटीकडे वळवला. त्याने अवघ्या काही क्षणांत दानपेटीचे कुलूप तोडले. त्यातील सर्व रोख रक्कम एका कपड्यात गोळा केली. यानंतर ती रक्कम घेऊन त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप
चोरीची ही संपूर्ण घटना मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली. देवाचे दर्शन घेऊन, पाया पडून चोरी करणाऱ्या या चोरट्याचे कृत्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच देवाच्या पाया पडून चोरी करण्याच्या या विलक्षण कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे या अज्ञात चोरट्याचा कसून शोध सुरू केला आहे. धार्मिक स्थळी, दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे आता मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पाहा व्हिडीओ :
हेही वाचा : चांदीवर सोन्याचे पाणी, बनावट हॉलमार्क अन्… कल्याणमध्ये बंटी-बबलीचा नवा कारनामा, पोलिसही हादरले

