सुनेच्या डोक्यात रॉड घातला अन् नंतर मित्राला बोलवून… कल्याण हादरले
कल्याणमध्ये संपत्ती आणि रेल्वेच्या नोकरीसाठी सासूनेच आपल्या सुनेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी सासू आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे.

कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या हव्यासापोटी नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. वालधुनी नदी पुलाखाली सापडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा अखेर झाला आहे. स्वतःच्या सासूनेच आपल्या मित्राच्या मदतीने सुनेचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावून सासू आणि तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
गुरुवारी १ जानेवारी २०२६ च्या रात्री कल्याणमधील वालधुनी पुलाखाली एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेला तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र जखमांचे स्वरूप पाहून पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली.
या तपासादरम्यान मृत महिलेची ओळख रुपाली विलास गांगुर्डे (३५) अशी असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, रुपाली बेपत्ता झाल्याची तक्रार तिची सासू लताबाई गांगुर्डे (६०) हिनेच पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यानंतर पोलिसांना तिच्या सासूच्या वागण्यावर संशय बळावला. या सखोल चौकशीत लताबाईने आपला मित्र जगदीश म्हात्रे (६७) याच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली.
यावेळी पोलिस तपासात हत्येमागचे मुख्य कारण आर्थिक वाद असल्याचे समोर आले. रुपालीच्या पतीचा मृत्यू सप्टेंबर २०२५ मध्ये झाला होता. पतीच्या निधनानंतर त्याची रेल्वेतील नोकरी अनुकंपा तत्त्वावर रुपालीला मिळणार होती, ज्याला सासूचा विरोध होता. तसेच पतीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवरून सासू-सुनेमध्ये सतत खटके उडत होते.
दोन्ही आरोपींना कोठडी
गुरुवारी १ जानेवारीच्या रात्री सासू-सुनांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेला. यावेळी लताबाई आणि जगदीश म्हात्रे यांनी मिळून रुपालीवर लोखंडी रॉडने जबर प्रहार केले. तिचा जागीच मृत्यू झाल्यावर त्यांनी घरातील रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट केले. त्यानंतर त्यांनी मृतदेह रिक्षातून नेऊन वालधुनी पुलाखाली फेकून दिला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे.
