ते फुकटचं श्रेय घेण्यासाठी येतात… किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दलाची जोरदार घोषणाबाजी; पोलीस ठाण्याबाहेर नेमकं काय घडलं?
Kirit Somaiya News: किरीट सोमय्यांच्या कारवाईच्या मागणीदरम्यान बजरंग दलाचा विरोध दिसून आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रबाळे पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे.

नवी मुंबईत लव जिहादची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन हिंदू मुलगी 38 वर्षीय मुस्लीम मुलाने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे. यानंतर आता खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी कारवाईची मागणी केली होती. मात्र यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचे दिसून आले.
किरीट सोमय्या फुकटचे श्रेय घेण्यासाठी येत आहेत. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. आधीपासून करत आहोत. मात्र आम्हाला किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. हे योग्य नाही. आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. आम्ही त्यांचा विरोध करणार आहोत, अशी प्रतिक्रिया बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिली आहे.
तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी अशा नराधमांवर कारवाई झालीच पाहिजे. अतिरिक्त आयुक्त यांच्यासह एक टीम तयार केली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितले. यानंतर किरीट सोमय्या प्रसारमाध्यमांशी बोलत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे समोर आले आहे.
यावेळी मुलीच्या आई वडिलांनी आमच्या मुलीला परत आणून मुलावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आम्हाला पोलिसांनी न्याय द्यावा, अशीही मागणी मुलीच्या पालकांकडून करण्यात आली आहे. मात्र किरीट सोमय्या आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष यावेळी दिसून आला आहे.
