पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?

पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. (know about pooja chavan suicide case till today)

भीमराव गवळी

|

Feb 13, 2021 | 11:49 AM

मुंबई: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांचं नाव भाजपने घेतल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पूजाच्या आत्महत्येपासून ते आतापर्यंत नेमकं काय घडलं? याचा घेतलेला हा आढावा. (know about pooja chavan suicide case till today)

पूजाची आत्महत्या

पूजाने रविवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. पुण्यातील वानवडी येथे इमारतीवरून उडी घेऊन तिने आत्महत्या केली होती. तिच्या डोक्याला आणि मनक्याला गंभीर दुखापत झाल्याचंही सांगितलं जात आहे. पुण्यात येऊन दोनच आठवडे होत नाहीत तोच तिने हे टोकाचं पाऊल उचललं होतं.

11 ऑडिओ क्लिपने खळबळ

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलीसांनी दिली आहे ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण आता तापत चाललं असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होत आहे.

विदर्भातील मंत्र्यांचं कनेक्शन?

पूजाच्या आत्महत्येनंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. एक मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याचं त्यात संभाषण आहे. हा मंत्री विदर्भातील असून त्याचं पूजासोबत प्रेमप्रकरण असावं, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

वडील म्हणाले, चौकशी करा

पूजाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे कुटुंब मानसिक धक्क्यात असून कुटुंब काही बोलायला तयार नाही. परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा एवढीच मागणी पूजाच्या वडिलांनी केली.

पंकजा मुंडेंची सर्वात आधी मागणी

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सर्वात आधी चौकशीची मागणी केली होती. पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

चंद्रकांतदादांचा सरकारला सवाल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली. या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

राठोड नॉट रिचेबल

पूजाने रविवारी आत्महत्या केल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. त्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्यावरील आरोपही खोडून काढले नाहीत. त्यामुळे राठोड यांच्या भोवतीचा संशय अधिकच वाढला आहे.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास दहा ११ ऑडिओ क्लिप, फोटोज समोर आलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकलं. पोलीस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यांनी पहिल्यांदाच संजय राठोड यांचं थेट नाव घेऊन आरोप केला होता.

पूजाची बहीण दियाची पोस्ट

या प्रकरणी पूजाची बहीण दियाने एक भावूक पोस्ट केली आहे. त्यात तिने अनेक पूजाचं वर्णन करतानाच तिच्या मानसिकतेवरही भाष्य केलं आहे. दिया म्हणते, 2 दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काही ही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता, ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की कसं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलंपणे माहिती आहे. मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे. ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या , ती जर हे सर्व पाहात असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा.

जयंत पाटील म्हणतात…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती मला काहीच माहिती नाही मी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत आहे. मंत्रीमहोदयांचं थेट नाव घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. पाठीमागच्या काळातील घटना पाहिल्या की लक्षात येईल एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते. त्यामुळे थोडंसं संयमाने घेण्याची गरज आहे. पोलिस याबाबतचा सविस्तर तपास करतील, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

राठोड समर्थकांची बॅनरबाजी

या प्रकरणात संजय राठोड अडचणीत आल्याने त्यांचे समर्थक अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी थेट बॅनरबाजी सुरू केली आहे. राठोड यांच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर अनेक फोटो, मॅसेज, कमेंट्स पोस्ट केल्या जात आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर समर्थकांनी त्यांना समर्थन करणारे अनेक बॅनर पोस्ट केले आहेत. फेसबुकवरही त्याच्या समर्थकांनी अनेक बॅनर पोस्ट केले आहेत. “जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती, उसकी बदनामी शुरु की जाती है!!” अशी पोस्ट एका समर्थकाने फेसबुकवर केली आहे. यासह अनेक समर्थकांनी त्यांच्या समर्थनासाठी फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत.

फडणवीसांचं पोलीस महासंचालकांना पत्रं

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. या प्रकरणातील तथ्य बाहेर काढलं पाहिजे. जे काही सत्य असेल बाहेर आणायला हवं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. तसेच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच ऑडिओ क्लिपची चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालकांना पत्रं लिहिलं आहे. (know about pooja chavan suicide case till today)

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: भातखळकर

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. भातखळकर यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री ‘राठोडगिरी’ सहन करणार का? असा प्रश्न विचारलाय. भातखळकरांचं हे ट्वीट म्हणजे त्यांनी शिवसेनेच्या कुठल्या मंत्र्याकडे तर इशारा केला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तसंच संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भातखळकर यांनी केलीय.

थेट कॅमेऱ्यासमोर बोलण्यास संजय राऊतांचा नकार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. पण संजय राऊत यांनी थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असं राऊत यांनी म्हटलं. शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

शिवसेनेची पहिलीच प्रतिक्रिया

झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असं शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. टीव्ही 9 मराठीकडे एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसेनेची या प्रकरणात ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. (know about pooja chavan suicide case till today)

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पूजा आत्महत्याप्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी ही माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (know about pooja chavan suicide case till today)

संबंधित बातम्या:

Pooja Chavan Suicide Case Live Updates : संजय राठोडांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; चित्रा वाघ आक्रमक

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे म्हणतात…

(know about pooja chavan suicide case till today)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें