शरद पवारांनी कोरोना लस घेतली, पुण्यात नोंदणी सुरु, नागपुरात तांत्रिक गोंधळ

राज्यात ठिकठिकाणी कोरोना लसीकरणाची मोहीम आता वेग पकडण्याची शक्यता आहे. | Coronavirus vaccination

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:30 PM, 1 Mar 2021
शरद पवारांनी कोरोना लस घेतली, पुण्यात नोंदणी सुरु, नागपुरात तांत्रिक गोंधळ
देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

मुंबई: देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जाणार आहे. राज्यात ठिकठिकाणी कोरोना लसीकरणाची मोहीम आता वेग पकडण्याची शक्यता आहे.  (Coronavirus vaccination drive in Maharashtra)

शरद पवारांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात घेतली लस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी कोरोनाची लस (Covid 19 Vaccine) टोचून घेतली. काहीवेळापूर्वीच ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत. याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.

पुण्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाच्या नोंदणीला सुरुवात

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसरा टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त (को-मॉर्बिड) व्यक्ती आणि 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी आजपासून ‘कोविन अ‍ॅप 2.0’ हे नवीन व्हर्जन सुरू झालय. लस घेण्यासाठी इच्छुकांना या अ‍ॅपवर स्वतः नोंदणी करता येणार आहे. अ‍ॅपवर नोंदणी करणे शक्य नसल्यास जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनही करता येईल.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
– वयाचा पुरावा आणि छायाचित्र असलेले अधिकृत ओळखपत्र
– 45 ते 60 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्तींना (को-मॉर्बिड) नोंदणीकृत डॉक्टरांचे सर्टिफिकेट लागणार असून, त्याचा नमुना केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना व्याधीग्रस्त व्यक्तींना आजाराची माहिती द्यावी लागणार आहे.

नागपुरात तांत्रिक अडचणीमुळे खोळंबा

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला. नागपूर शहरात आज 11 केंद्रांवर तर ग्रामीणमध्ये 14 केंद्रांवर लसीकरण प्रक्रिया पार पडली. आता ज्येष्ठ नागरीकांसाठी लसीकरण सुरु झाले आहे. सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे तीन तास खोळंबा झाला होता, पण त्यानंतर सराव केंद्रांवर सुरळीत लसीकरण झाले.

नाशिकमध्ये खासगी लॅबकडून महापालिकेवर 500 कोटींचा दावा

नाशिकमध्ये कोरोना अहवाल संदर्भात खाजगी लॅब कडूनच नागरिकांची फसवणूक होत असून अहवालात हेराफेर होत असल्याचं प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले होते. यानंतर शहरातील नामांकित दातार लॅबला पुढील सूचना येईपर्यंत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी लॅबमधील काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र यावर आता दातार लॅब कडूनच जिल्हा प्रशासनावर 500 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला संधी न देताच हा निर्णय तात्काळ घेण्यात आल्याच दातार लॅब प्रशासनाच मत आहे. आम्ही प्रत्यक वेळी आरोग्य विभागाला मदत केली आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती दातार लॅब कडून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: आसामचा गमचा, पुद्दुचेरी-केरळच्या नर्स, चेहऱ्यावर स्माईल, मोदी आहेत तर चर्चा होणारच!

देशी की परदेशी,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती लस घेतली?

(Coronavirus vaccination drive in Maharashtra)