जर्मनीत महाराष्ट्र बिझनेस डे-2025 चे आयोजन, व्यापार, गुंतवणूक वाढवण्यासाठी नव्या बिझनेस फोरमची घोषणा!
जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील भारताचे वाणिज्य दूतावास आणि मराठी कट्टा जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने सालबाऊ बोर्नहाइम येथे महाराष्ट्र बिझनेस डे-2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील भारताचे वाणिज्य दूतावास आणि मराठी कट्टा जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने सालबाऊ बोर्नहाइम येथे महाराष्ट्र बिझनेस डे-2025 चे आयोजन करण्यात आले. अजित रानडे यांनीच ‘मराठी कट्टा जर्मनी’ स्थापन केलेला आहे. त्यांच्याच प्रयत्नातून इंडो-जर्मन सहकार्याचा हा नवा अध्याय रचला गेला.
महाराष्ट्र बिझनेस डे-2025 च्या यशस्वी आयोजनामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या आहेत. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यातील भागिदारी वाढवण्यासाठी उच्च शासकीय अधिकारी, मोठे उद्योगपती, नवउद्यमी यांना एकत्र येण्याची एक नवी संधी मिळाली. या कार्यक्रमामुळे फक्त महाराष्ट्र आणि जर्मनीमधीलच नव्हे तर समस्त युरोपमधील उच्च शासकीय अधिकारी, व्यावसायिक, नेते, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्या.
या कार्यक्रमाची मुख्य थीम ही ‘महाराष्ट्र, भारत-जर्मनी भेट : उद्योजकता, व्यापार आणि गुंतवणुकीचा एक मार्ग’ अशी होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रात असलेली उद्योजकतेची शक्ती, सांस्कृतिक एकता ठळकपणे दिसून आली. सोबतच या कार्यक्रमातून जर्मनी हा देशही जागतिक पातळीवर भागिदारी करण्यासाठी तयार असल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे
या कार्यक्रमात द्विपक्षीय व्यापार, स्टार्टपमध्ये कशी वाढ झाली पाहिजे, गुंतवणुकीसाठीची संधी या विषयांवर तज्ज्ञांमार्फत पॅनेल चर्चा घडवण्यात आली. सोबतच या कार्यक्रमात महाराष्ट्रातील काही शासकीय अधिकारीही सहभागी झाले होते. त्यांनीही महाराष्ट्रातर्फे प्रझेंटेशन सादर केले. भारत-जर्मनीमधील उद्योजकांच्या यशोगाथाही या कार्यक्रमात सांगण्यात आल्या.
कोणकोणत्या विषयांवर चर्चा
महिला उद्योजक तसेच महिला नेतृत्व समोर यावे यासाठी एक खास सेशन या कार्यक्रमात घेण्यात आले. स्टार्टअपस्ची अर्थव्यवस्था कशी काम करते? तरुण उद्योजक त्यांच्या नवनव्या संकल्पनांच्या माध्यमातून वेगवेगळे खंड, देश कसे एकत्र येत आहेत यावरही या कार्यक्रमात चर्चा झाली.
महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरमची स्थापना
दरम्यान, या कार्यक्रमात महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरमची (MEBF) सर्वांत मोठी घोषणा करण्यात आली. या बिझनेस फोरमच्या माध्यमातून व्यापार वृद्धींगत आणि मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच गुंतवणूक, सहकार्य मजबूत करण्यासाठी हे एक नवे व्यासपीठ तयार झाले आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, फ्रँकफर्टमधील भारताचे कॉन्सुल जनरल, MIDC चे अधिकारी तसेच महाराष्ट्र सरकारमधील प्रमुख धोरणकर्ते यावेळी उपस्थित होते.
