महाराष्ट्रात पूरस्थिती, कुठे ढगफुटी, तर कुठे नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईत संततधार पाऊस सुरु आहे. या संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत दमदार पावसाने नदी पात्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच कोकण आणि विदर्भात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र या सततच्या पावसामुळे काही पिकांना जीवनदान मिळाले आहे. जालना जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, आतापर्यंत ६९ टक्के पाऊस झाला आहे. विशेषतः बदनापूर आणि परतूर या दोन तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जळगावात ढगफुटीसदृश पाऊस, घरांमध्ये शिरले पाणी
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने धरणी नाल्याला मोठा पूर आला आहे. सुरक्षा कठडे नसल्याने पुराचे पाणी मोठ्या वेगाने जैन गल्ली आणि धरणी परिसरातील दुकाने व घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम
कोकणातही पावसाचा जोर कायम आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. तसेच अनेक नद्यांनी धोक्याच्या पातळी गाठली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले असून, डीबीजे कॉलेजसमोरील रस्ते जलमय झाले आहेत. गटारांचे पाणी रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी नदीचे पाणी बाजार पुलाला टेकले असून, प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
खेडमधील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून, खेड शहराला पुराचा धोका वाढला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, नदी किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील गड नदीचे पाणी पुन्हा माखजन बाजारपेठेत शिरले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे आणि नदीकाठी दुकाने असल्यामुळे थोडे जरी पाऊस पडला तरी येथे पाणी भरते. सध्या १० ते १२ दुकानांमध्ये पाणी शिरले असून, दुकानदार सतर्क असल्याने मोठ्या नुकसानापासून बचाव झाला आहे.
धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धाराशिव, तेर, ढोकी या गावांचा पाणी प्रश्नही मिटणार आहे.
नांदेडच्या ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, गावे पुराच्या वेढ्यात
नांदेड जिल्ह्यातील ईसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात (४८,२०५ क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. किनवट तालुक्यातील पिंपरी आणि भंडारवाडी ही दोन गावे पुराच्या वेढ्यात सापडली आहेत. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने, गावकऱ्यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाले आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये कामासाठी जावे लागेल, अशी व्यथा मांडली आहे.
