विनोद तावडेंकडून शिक्षकांसाठी गुड न्यूज

  • Sachin Patil
  • Published On - 20:05 PM, 28 Nov 2018

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होणार असं केवळ आश्वासन देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांसाठी गुड न्यूज दिली आहे. राज्यातील जवळपास 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचं विनोद तावडे म्हणाले आहेत. अर्थसंकल्पात पावणे तीनशे कोटींची तरतूद यासाठी केली जाणार आहे.

येत्या दोन महिन्यांमध्ये सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची तरतूद करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असंही विनोद तावडे यांनी विधानसभेतील निवेदनात स्पष्ट केलं. खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध अधिवेशन संपल्यानंतर पुढील 15 दिवसांत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष यांची बैठक विधानभवनात पार पडली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पावणे तीनशे कोटींच्या अनुदानासाठी परवानगी दिली असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.