Uddhav Thackeray : आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर… उद्धव ठाकरे यांचा केंद्राला दम; नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक धोरणात हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करून, त्यांनी सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिले आणि मराठी भाषेचे संरक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक धोरणानुसार, आता सर्व शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसह हिंदी ही तिसरी भाषा असून ती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र या मुद्यावर राज्यात राजकीय रण पेटलं असून साहित्यिक, अनेक राजकारण्यांनी हिंदीच्या सक्तीला विरोध केला आहे. मनसेनेही सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. हिंदीच्या सक्तीच्या मुद्यावरू विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही सरकारला यावरून सुनावलं. हिंदीची सक्ती आहे. आम्ही प्रेमाने सगळं ऐकू. पण सक्ती कराल तुमच्यासकट सगळं उखडून फेकू, असा थेट इशारा देत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला दम दिला. भारतीय कामगार सेनेनच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी ते बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
हिंदीची सक्ती आहे. आम्ही प्रेमाने सगळं ऐकू. पण सक्ती कराल तुमच्यासकट सगळं उखडून फेकू. अमराठी पिढ्यान पिढ्या राहत आहेत. ते मराठी शिकत आहेत. आमच्या क्लासला येत आहेत. ते पाहिल्यावर यांच्या पोटात गोळा आला. हिंदीची सक्ती करायला लागली. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय माझ्या सरकारने घेतला आहे. जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे. तुम्ही हिंदीची सक्ती करत असाल, होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे असं उद्धव यांनी सुनावलं.
सर्व दुकानावर पाट्या मराठीत लिहिण्याचा आम्ही कायदा केला. या सरकारने त्याची किती अंमलबजावणी केली? असा सवालही उद्धव यांनी विचारला. काही नतद्रष्ट कोर्टात गेले. अरे इथे राहता, इथलं मीठ खाता आणि मराठीला विरोध करता? आपलं सरकार असताना कुणाची हिंमत नव्हती. आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत. मराठीची गळचेपी करणाऱ्यांचे पाय चाटत आहेत. हे कसले बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहेत, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेना टोला लगावला.
महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का? त्यांचं सरकार इकडे बसलं. ते सत्ताधारी आमच्यावर राज्य करत आहे का. महाराष्ट्राचे मारेकरी त्यांची सुपारी घेतलेले सत्ताधारी दुर्देवाने महाराष्ट्राला लाभले का? पण यांचं सरकार आल्यावर मराठी नही आती. मराठी लोक गंदे है, वह नॉनव्हेज खाते है. जसं आपण म्हटलं होतं ना इस देश में रहना होगा तो वंदे मातरम बोलना होगा, तसं इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना होगा, असं मी सांगतोय, असं उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितलं.
