महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, ओवैसींचा पक्ष निवडणूक रिंगणात?, चुरस वाढणार
स्थानिक स्वराज संस्थांसाठी नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात हालचाली सुरु झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्षांसोबत इतर काही पक्षही येणार आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने आपली जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोबवण्याचे प्रयत्न करणारी असदुद्दीन ओवैसी यांची AIMIM पक्षही निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी महाराष्ट्र सरकारला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
राज्यात सहा प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय झाले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही रोमांचक होणार आहेत. अनेक लहान पक्षांनीही काही जागांवर तयारी सुरु केली आहे. यामुळे चुरस वाढणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याचे राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आता सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला आहे.
महाराष्ट्रात महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर विरोधी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. तसेच एआयएमआयएमने गुरुवारी राज्य कार्यकारणीची बैठक बोलवली. त्या बैठकीत राज्यातील आगामी सर्व निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे राज्य अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महायुतीसोबत युतीची शक्यता फेटाळली. परंतु इतर कोणी सोबत येणार का? त्याबाबत चर्चा सुरु आहे, असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांत चर्चा सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीऐवजी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.