आमच्याकडे तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार.. शिंदे गट-भाजपमधील वाद विकोपाला, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिंदे गट शिवसेना आणि भाजप यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. एकमेकांचे पदाधिकारी फोडणे, युतीधर्माचा भंग करणे अशा आरोपांमुळे दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता कल्याण-डोंबिवली महापालिकेसह अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. केंद्रात आणि राज्यात एकत्र असलेले हे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर युतीधर्म पाळण्यास तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या वादाची सुरुवात अंबरनाथमध्ये झाली. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजपला थेट इशारा दिला. तुम्ही युतीधर्म पाळणार नसाल, तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार आहे, असे बालाजी किणीकर यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे स्थानिक पदाधिकारी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.
शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला
अंबरनाथनंतर कल्याण-डोंबिवलीमध्येही शिवसेना आणि भाजप हा वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट ओपन चॅलेंज दिले. याल तर सोबत, नाहीतर… आडवे करू! असे आक्रमक वक्तव्य करत मोरे यांनी केले आहे. यामुळे शिंदे गटाने अप्रत्यक्षपणे भाजपला युतीशिवाय स्वबळावर लढण्याचे आव्हान दिले. कुणाला वाटत असेल, बिना युतीने, कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आम्ही स्वतः लढायला तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच ठिकाणी भाजपला आव्हान दिल्याने संघर्षाची तीव्रता वाढली आहे.
शिंदे गटाच्या या आक्रमक भूमिकेवर भाजपने तात्काळ आणि तितकेच जशास तसे प्रत्युत्तर दिले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिंदे गटाला त्यांच्या पूर्वीच्या भूमिकांची आठवण करून दिली. युती झाली तेव्हा तुम्ही गद्दारी केली आणि आमचे लोक पडले. युती झाली नाही, तेव्हा भारतीय जनता पार्टी जिंकली आणि तुम्ही आडवे झाले. भाजपला आडवी करण्याची भाषा वापरू नये, असे नरेंद्र पवार यांनी म्हटले. पवार यांनी आमदार किणीकर आणि अरविंद मोरे यांना युतीधर्माची आठवण करून देत मोठे विधान केले. युतीमुळेच तुम्ही आमदार झालेले आहात. खासदार श्रीकांत शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या युतीमुळे खासदार झाले असे सांगत त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना त्यांच्या राजकीय यशाचे श्रेय युतीला दिले.
अशी भाषा करू नका
“अशी भाषा करू नका. युती नका करू, तुमची अवस्था काय आहे ते त्यानंतर बघा,” असा थेट सवाल नरेंद्र पवार यांनी केला. तसेच केंद्रात, राज्यात आणि पालिकेतही युती व्हावी, यासाठी शिंदे गटाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असा आग्रह नरेंद्र पवार यांनी धरला आहे.
दरम्यान या सर्व घडामोडींमुळे अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरोधात उभे राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे दोन्ही पक्षांकडून सुरू असलेली ही खडाजंगी पाहता युती होणार की नाही, यावर राजकारणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
