
राज्यात आज महानगरपालिका निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महापालिका निवडणुकीसाठी विविध शहरांमधून हिंसाचार, तोडफोड आणि राजकीय संघर्षाच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. आज सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येत असला, तरी अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने निवडणूक केंद्रांना जणू आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमुळे शांततेत पार पडणाऱ्या लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यामुळे मतदारांमध्ये काही काळ भीतीचे तर काही ठिकाणी संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. धुळ्यातील खोली क्रमांक १ मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत मतदान यंत्राची (EVM) तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला आहे. या घटनेमुळे मतदान प्रक्रिया तब्बल दीड ते दोन तास विलंबाने सुरू झाली. आमदार मंजुळा गावित यांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कारवाईची आणि मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.
BMC Election Exit Poll 2026 : शिवसेना ठाकरे गटासोबतच मनसेला थेट धक्का...
BMC Election Exit Poll 2026 : भाजपा शिवसेना शिंदे गटाची बाजी, एक्झिटपोलनुसार मोठा अंदाज...
अभिनेते मकरंद देशपांडेंकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी पत्नीसह केलं मतदान
Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
Nanded Election Poll Percentage : नांदेड महापालिकेसाठी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41.65 टक्के मतदान
छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-३-४ परिसरातील संत मीरा मतदान केंद्रावर मोठा राडा झाला. भाजप उमेदवाराने पोलचीटवर पक्षाचे चिन्ह आणि कोडिंग असलेले टी-शर्ट वापरल्याचा आक्षेप शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी घेतला. यावरून अपक्ष उमेदवार आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. परिस्थिती पाहता पोलीस आयुक्तांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक २१ मध्ये तणाव निर्माण झाला आहे. भाजप उमेदवार नितीन खोले हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी दोन्ही गटाचे पदाधिकारी आमनेसामने आल्याने नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नागपूरमध्ये भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. या हल्ल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे.
दहिसरमधील वॉर्ड क्रमांक १० मध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. बनावट मतदान रोखण्यासाठी गेल्याचे सांगणाऱ्या मनसेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच विरारमधील बहुजन विकास आघाडीच्या बुथवर भाजप कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप उमेदवार प्रशांत राऊत यांनी केला आहे.
चंद्रपूरच्या नेहरू शाळा मतदान केंद्रावर शिवसेना शिंदे गट (इसमत हुसेन) आणि भाजप बंडखोर (दीपा कासट) यांच्या समर्थकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्यावरून राडा झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला. तसेच मालेगावमधील केंद्र क्रमांक ९ वर बोगस मतदानाचा संशय आल्यानंतर उमेदवाराने आक्षेप घेताच संबंधित व्यक्तीने तेथून पळ काढला. आधार कार्डवर नाव नसतानाही मतदान होत असल्याचा गंभीर आरोप येथे करण्यात आला आहे.