
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. 15 जानेवारीला पार पडणाऱ्या मतदानाचा निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहे. सध्या अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी पक्ष युती आणि आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बैठकांना आणि जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. काही ठिकाणी युती आणि आघाडीची घोषणा झाली आहे. आजपर्यंत कोणत्या महानगर पालिकेत युती किंवा आघाडीची स्थिती काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील बहु चर्चित मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने युती केली आहे. मात्र जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबत अद्याप बोलणी सुरू आहेत. दुसरीकडे महायुतीचे जागावाटप अंतिम टप्यात आले आहे. लवकरच कोण किती जागा लढवणार याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून लढणार आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना 84 आणि भाजप 47 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी येथे स्वतंत्र लढणार आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने युती केली आहे. मात्र अद्याप जागावाटप झालेले नाही. तर काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेत शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची मागणी करत आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवर युतीसाठी चर्चा सुरू आहे. भाजपचे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात आतापर्यंत 2 बैठका झाल्या आहेत, मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. अजित पवार यांची राष्ट्रवादी नवी मुंबईत स्वतंत्र लढणार आहे. तर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.
पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे, कारण युतीसाठी आतापर्यंत 2 बैठकी झाल्या आहेत, मात्र त्यात युतीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पनवेलमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेना ठाकरे गट, शेकाप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने युतीची घोषणा केली आहे. मात्र या पक्षांचेही जागावाटप अद्याप ठरलेले नाही.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत भाजपने 50-55 जागांची तर शिवसेनेने 66 जागांची मागणी केली आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात अनेक बैठका झालेल्या आहेत, मात्र अंतिम तोडगा अद्याप निघालेला नाही. कल्याणमध्ये ठाकरे बंधू एकत्रित लढणार आहेत. मात्र जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युतीही होण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत 12 जागांवरून महायुतीचं समीकरण रखडलेलं आहे. त्यामुळे अंतिम जागावाटप अद्याप झालेले नाही. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे. या महानगर पालिकेत ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे, मात्र जागावाटपाची घोषणा अद्याप झालेली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात युतीची बोलणी सुरू आहेत.
वसई विरार महानगर पालिकेत बहुजन विकास आघाडीने मनसे आणि काँग्रेससोबत युती केली आहे. तर ठाकरेंची शिवसेना, भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे वर्चस्व आहे. महापालिकेत सत्ता राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
मिरा भाईंदर महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेनेने युतीची घोषणा केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. दोन्ही ठाकरे बंधुंसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे.
जळगाव महापालिकेसाठी महायुतीची घोषणा झालेली नाही, शिवसेनेसोबत युती निश्चित आहे मात्र महायुती नाही अशी माहिती भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राष्ट्रवादीसोबत चर्चेनंतरच महायुतीची घोषणा करू असंही त्यांनी म्हटले आहे.