विधानमंडळातील विरोधी पक्षनेतेपदाचा पेच संपता संपेना, कोणाचं नाव चर्चेत? नियम काय?
नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावरून तीव्र राजकीय वाद सुरू आहे. वर्षभराहून अधिक काळ ही पदे रिक्त असल्याने महाविकास आघाडीने चहापानावर बहिष्कार टाकला. सत्ताधारी संविधानाचा अनादर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

नागपूरमध्ये आज (८ डिसेंबर) महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावरून मोठे राजकारण घडताना दिसत आहेत. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेत्याची पदे रिक्त आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका करत चहापानावर बहिष्कार टाकला. आता याप्रकरणी विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकासआघाडीकडून एक नावही चर्चेत असल्याचे बोललं जात आहे.
विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
गेल्या वर्षभरापासून विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी मविआने प्रथेनुसार दिलेल्या सरकारी चहापानाच्या आमंत्रणाकडे पाठ फिरवली. महाविकासआघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यावरुन टीका केली. ही दोन्ही पदे संवैधानिक आहेत. ती रिक्त ठेवून सत्ताधारी संविधानावर अविश्वास दाखवत आहेत. त्यामुळेच त्यांनी चहापानाला न जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी रिक्त ठेवण्यात आले आहे, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
जर त्यांची नियतच ठीक नसेल तर आपण त्याला काही बोलू शकत नाही. विरोधी पक्षनेतेपद हे आपलं संवैधानिक पद आहे आणि ते तुम्ही रिक्त ठेवताय हा तुमचा मनमानी कारभार आहे, असे चालणार नाही. तुम्हाला विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी नेमकं दु:खं काय, आम्ही नाव दिलं आहे. त्यावर काय तो निर्णय घ्या. पण त्यांना करायचं नसेल आणि लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचा नसेल तर त्यांना संवैधानिक लोकशाही मान्य नाही, असा त्याचा अर्थ होतो. विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के अट कुठेही नाही, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
राम शिंदे काय म्हणाले?
याबद्दल विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदासाठीचा प्रस्ताव सादर झाला आहे. लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे राम शिंदे म्हणाले.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष महोदयांच्या अख्यातरीत असणार आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा आग्रह आणि दुराग्रह नाही आहे. नागपूरच्या अधिवेशनात कामकाज आम्ही करत असतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आदित्य ठाकरेंचे नाव चर्चेत
दरम्यान सध्या रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आता शिवसेनेचे ठाकरे गट आग्रही असल्याचे बोललं जात आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे सध्या विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आले आहे. उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे सध्या गटनेते आहेत. त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास त्यांना अनुभव मिळेल आणि ते आक्रमकपणे प्रचार करू शकतील, असे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनुभवी आणि आक्रमक नेते असलेले भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत होते. आता भास्कर जाधव यांचे नाव मागे पडून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे ते नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्षनेतेपद रिक्त का आहे?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी २८८ जागा असलेल्या विधानसभेत एकूण जागांच्या किमान १०% जागा (म्हणजे २९ आमदार) असणे आवश्यक आहे.
विधानसभा सदस्य संख्या
- ठाकरे गट (शिवसेना): २०
- काँग्रेस: १६
- शरद पवार गट (राष्ट्रवादी): १०
- महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे २९ आमदार नाहीत, त्यामुळे हे पद रिक्त आहे.
विधान परिषद
या ठिकाणी काँग्रेसकडे ८, राष्ट्रवादीकडे २ आणि ठाकरे गटाकडे ५ आमदार आहेत. १० टक्के नियमानुसार (किमान ८ आमदार) काँग्रेसला विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. या सर्व घडामोडींमुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
