Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन, अनेक जिल्ह्यात बरसला
Maharashtra News LIVE : या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने काही जिल्ह्यात हजेरी लावली आता 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान पुन्हा सांगावा धाडला आहे. या काळात राज्यात दमदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजही काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॅाक्टरांच्या कामाचा ताण कमी होणार
राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॅाक्टरांच्या कामाचा ताण कमी होणार. डॅाक्टरांचे कामाचे तास निश्चित होणार. वैद्यकीय अधिकारी संघटना, आरोग्य आयुक्त आणि आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय. कामाचे तास कमी करण्यासाठी समिती गठीत, आठ तास ड्युटी असावी अशी मागणी. कामाच्या ताणामुळे राज्यात डॅाक्टरांनी आत्महत्या केल्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर. पदव्युत्तर अभ्यासक्रमास गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनावर कायम तोडगा निघाला. राज्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमास गेलेल्या ४०३ डॅाक्टरांचं चार महिन्यांपासून रखडलं होतं वेतन. आता येत्या सात दिवसांत ४०३ डॅाक्टरांचं थकित वेतन मिळणार
-
केळीला चांगला भाव मिळाल्याने जळगावातील शेतकऱ्याचा अनोख्या पद्धतीने आनंद साजरा
केळीला चांगला भाव मिळाल्याने जळगावातील सुनसगाव येथील शेतकऱ्याचा अनोख्या पद्धतीने आनंद साजरा. केळीला तब्बल २,३०० रुपये क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकरी समाधान महाजन यांचा अनोखा आनंदोत्सव. समाधान महाजन यांच्याकडून टाळ-मृदुंगाच्या तालावर भजन-कीर्तन, फुगड्या खेळत साजरा केला आनंद. समाधान महाजन यांनी शेतात २० हजार केळीच्या झाडांची लागवड केली असून पहिल्याच तोडणीत जवळपास ५ लाख रुपयांचे उत्पन्न. अजून ४ ते ५ तोडण्या बाकी, त्यामुळे सर्व तोडण्यांमधून जवळपास २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न होण्याचा अंदाज. चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्याच्या मेहनतीला मिळाले यश; अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त
-
-
धुळ्यात FDA ची कारवाई
धुळ्यात FDA ची कारवाई झाली आहे, गाय व म्हशीच्या तुपाबाबत संशय असल्याचे अधिकाऱ्यांनी नमुने घेतले आहेत. संशयित तूप, लाडूंचा साठा जप्त केला गेला.
-
पाकिस्तानात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा
पाकिस्तानात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. मुस्लिम कारागिराने साकारली बाप्पाची मूर्ती, यामुळे धार्मिक सलोखा जपला जातोय अशा संदेश सर्वत्र पसरत आहे.
-
गंगापूर रोड दुभाजकावरील झाडे तोडल्याप्रकरणी ६ जणांना अटक
गंगापूर रोड दुभाजकावरील झाडे तोडल्याप्रकरणी ६ जणांना अटक, ४दिवसांची पोलीस कोठडी…नाशिक सत्र न्यायालयात आरोपींना करण्यात आले होते हजर…नम्रता अॅडव्हर्टायझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख यांच्यासह सहा जणांवर कारवाई…अभिमन खैरनार, दिलीप बेंडकुळे, दीपक दाते यांचा अटकेतील आरोपींमध्ये समावेश…रोहिदास खुरखुटे, अर्जुन चारोस्कर यांच्यावरही कारवाई…जाहिराती दिसाव्यात म्हणून रात्रीतून झाडांची कत्तल केल्याचा आरोप…दुभाजकावरील ५० हून अधिक झाडे तोडल्याची तक्रार; जड सोडल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद…गंगापूर पोलिसांची मोठी कारवाई; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप…
-
-
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी २४० कोटींची तरतूद
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाला मोठा निधी मिळाला आहे. प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारने राज्याच्या हिश्श्याचे आणखी २४० कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.या निधीमुळे रेल्वेमार्गाच्या पुढील कामांना गती मिळणार असून, डिसेंबर २०२९ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला आणखी बळ मिळाले आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
-
शिरूर शहरात गोळीबार; तरुणाचा मृत्यू
शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या वेळी झालेल्या गोळीबारामुळे शिरूर शहर हादरले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, गोळीबारामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेमुळे शिरूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
-
सांगलीच्या मानाचा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री उपस्थित राहणार का?
सांगलीच्या मानाचा आणि गणपती पंचायतन संस्थांच्या गणपतीची शाही मिरवणुकीने आज विसर्जन होणार आहे,दुपारी 3 वाजता सुरू होणाऱ्या या मिरवणुकीत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह कुटुंब सहभागी होणार आहे.प्रतिष्ठापनेच्या दिवशी आरतीवरून अभिनेत्री भाग्यश्री आणि पटवर्धन कुटुंबातला वाद चव्हाट्यावर आला होता, त्यामुळे आज च्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री उपस्थित राहणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले.
-
कल्याण पूर्वेत वेल्डिंग दुकानात सिलेंडरचा स्फोट
कल्याण पूर्वेत वेल्डिंग दुकानात सिलेंडरचा स्फोट; पहाटेच्या सुमारास घडली भीषण घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरातील शास्त्रीनगर येथील वेल्डिंग दुकानात सिलेंडरचा स्फोट. पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल; अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानाचे मोठे नुकसान.
-
रायगड मधल्या राजकीय विरोधकांची भेट
मंत्री भरत गोगावले यांनी घेतली खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी भेट दिली. मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे हे देखील उपस्थित होते.
-
अकलूजमध्ये ‘शुद्धतेतून समृद्धीकडे’चा संदेश; गौराईच्या देखाव्यातून दूध भेसळीवर भाष्य
अकलूजमधील संगिता देशमुख यांच्या घरी यंदाच्या गौरी-गणपतीच्या देखाव्यातून दूध भेसळीविरोधात सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला आहे. गौराईच्या हातात शुद्ध दुधाची किटली, सोबत दूध उत्पादक शेतकरी महिला आणि भेसळयुक्त दुधावर कारवाई करणारे अधिकारी असा देखावा साकारण्यात आला आहे. तुकाराम मुंढे आणि FDA प्रशासनाच्या कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, शुद्ध दुधाला प्रोत्साहन मिळावे आणि प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा न्याय्य लाभ मिळावा, अशी प्रार्थना या माध्यमातून करण्यात आली आहे.
-
पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उद्या वाशिम दौऱ्यावर
पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उद्या वाशिम दौऱ्यावर आहेत. पाच तालुक्यांत शेतपिकांची प्रत्यक्ष करणार पाहणी करणार आहे. पावसाअभावी सोयाबीन, तूर, कपाशीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहे. शेतकऱ्यांशी बांधावरच साधणार थेट संवाद साधणार आहे.
-
वाळवा तालुक्यात पावसाची दडी, भात पीक धोक्यात
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. विशेषतः वाळवा तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने भात पिकाला मोठा फटका बसला असून, परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, एका शेतकऱ्याने नाईलाजाने आपल्या शेतातील भात पिकावर अक्षरशः नांगर फिरवला आहे.
-
उमरग्यात वनरक्षकावर शाईफेक; ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
उमरगा येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात वनरक्षक काका बापूराव मगर यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेच्या तीन कार्यकर्त्यांवर उमरगा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोपवाटिका, घनवन, रस्त्यालगत वृक्षलागवड तसेच विविध वनीकरणाच्या कामांमध्ये बोगस मजुरांची नावे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता.या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई झाली नसल्याचा आरोप करत कार्यालयीन वेळेत वनरक्षक मगर यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली होती
-
डिंबे-माणिकडोह बोगदा प्रकल्पाला मंजुरीनंतर आमदार दिलीप वळसे पाटलांकडून विरोध
अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यात पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बोगद्याला विरोध करत मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्प स्थगितीची मागणी केली आहे.वळसे पाटलांचा विरोध म्हणजे संकुचित दृष्टिकोन अशी टीका ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी केली आहे.
-
लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस
लातूर जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आहे, बऱ्याच दिवसांच्या खंडा नंतर लातूर शहर आणि ग्रामीण भागात मोठा पाऊस झाला आहे. मध्यरात्री नंतर पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. वातावरणात कमालीची उष्णता वाढली होती. या पावसामुळे वातावरण सामान्य व्हायला मदत होणार आहे. वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यातल्या अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
-
हिंगोलीत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
हिंगोली जिल्ह्यात पावणे दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली. हाता तोंडाशी आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातचे गेल्या नंतर हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली. मूग ,उडीद ,सोयाबीन सोडून इतर खरीपाच्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला.
या आठवड्याच्या सुरूवातीला काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पण दमदार पाऊस झाला नाही, आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान पुन्हा सांगावा धाडला आहे. या काळात गोव्यासह राज्यात दमदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकरी, जनावरांना दिलासा मिळेल. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. काल आणि आज काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राज्यात गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. अनेक मंडळांनी आकर्षक सजावट केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कार्यक्रमानंतर काल गुजरातमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या सुरू असलेल्या सुनावणीबाबत आणि निधी वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेयाची खात्रीलायक सुत्रांनी ही माहिती दिली. काळजी करू नका असा सल्लाही अमित शाह यांनी दिल्याचे समजते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देऊन उपोषण सोडले. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तर आदित्य ठाकरे यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून, टीव्ही आणि सोशल मीडिया ट्रायल्स थांबवून CBI ला निःपक्षपातीपणे तपास करू देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यावर ५०० कोटींची बदनामीची नोटीस बजावल्याचे समोर आले आहे.