Maharashtra News LIVE : उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात
Maharashtra News LIVE : नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवहान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केलं आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, राजकारणातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES
-
सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग
सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग लागली आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील पीपी टॉवेल कारखान्याला अज्ञात कारणाने ही आग लागली आहे. टॉवेल कारखान्यातील बॉयलर शेजारी आग लागल्यामुळे धुराचे लोट निर्माण झाले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू झाले आहे.
-
सुनिल तटकरे यांच्या नाराजीचे पडसाद; वाकडीकरांवर संताप, बावनकुळे यांची माफी
अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व महसूल दिन कार्यक्रमात’ आमंत्रणाच्या मुद्द्यावरून मोठे नाराजी नाट्य रंगले. कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावर भर कार्यक्रमात संताप व्यक्त केला. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंचावरून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. या घडामोडींनंतर आता स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “चांगल्या कार्यक्रमांमध्ये वाद निर्माण करणे हा तटकरे कुटुंबाचा गुणधर्म आहे. लोकांना कमी लेखून राजकीय फायदा घेण्याची ही त्यांची कार्यपद्धती आहे. हा तमाम रायगडवासीयांचा अवमान असून जनता याचा योग्य वेळी विचार करेल,” अशा शब्दांत दळवी यांनी तटकरे यांच्यावर घणाघात केला आहे.
-
-
उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात
उजनी धरणातून 80 हजार तर वीर धरणातून 63 हजार इतक्या विसर्गाने भीमा नदी वाहणार असल्याने नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष प्रणिता भालके, मुख्याधिकारी महेश रोकडे स्वतः व्यास नारायण झोपडपट्टीत काल रात्रीपासून ठाण मांडून आहेत. तर कालपासून त्या या नागरिकांना मदत करत स्थलांतर करण्यास सांगत आहेत.
-
मंत्री गिरीश महाजन नाशिक शहरातील खड्ड्यांवरून संतप्त
नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामे सुरू असून कुंभ प्राधिकरणाच्या बैठकीत MNGL चे अधिकारी गैरहजर राहिल्याने गिरीश महाजन यांनी त्यांना फोनवरून खडसावले. काल नाशिक महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत मनपा आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांना MNGL जबाबदार असल्याची मंत्री गिरीश महाजनांकडे तक्रार केली होती. सलग दुसऱ्या दिवशी बैठकीसाठी MNGL चे अधिकारी गैरहजर राहिल्याने मंत्री गिरीश महाजन संतापले आहेत.
-
जळगावात मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प
जळगावात येथून जाणाऱ्या मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध ट्रक नादुरुस्त झाल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूने तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. क्रेनच्या मदतीने नादुरुस्त ट्रक रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
-
-
भोंदू अशोक खरातला सात दिवसांची पोलिस कोठडी
समता पतसंस्थेत बनावट खाते उघडून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार केल्या प्रकरणात राहाता न्यायालयाने भोंदू अशोक खरात याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. राहाता पोलीस ठाण्यात खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समता पतसंस्थेत 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडली आहेत. या खात्यावरून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
-
जालना शहरात लुटमार करणाऱ्या त्रिकुटाला अटक
जालना शहरातल्या एमआयडीसी परिसरात लुटमार करून पैसे चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. एमआयडीसी परिसरात 2 दिवसांपूर्वी स्कुटीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीची रोख रक्कम हिसकावून पलायन केल्याची घटना घडली होती,त्यानंतर पोलिसांनी लूटमार करणाऱ्या तिघांच्या टोळीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जवळपास 5 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केलाआहे.
-
4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार व खून प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा
चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला सांगली जिल्हा सत्र न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
-
जळगावात एमडी ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; 62 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त
जळगावात एमडी ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; 62 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त
एमआयडीसीमधील एफसीआय गोदामासमोरील रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2 लाख 88 हजार रुपये किमतीचं ड्रग्स, मोबाईल व दुचाकी असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिस कारवाईत एक आरोपी अटकेत, दुसऱ्याचा शोध सुरू
-
पाकिस्तानात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका इस्लामिक धर्मगुरूची गोळ्या झाडून केली हत्या
पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका इस्लामिक धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. ही घटना शुक्रवारी दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्यातील बिरमल तहसीलमध्ये घडली, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी स्थानिक ‘जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल’ (JUI-F) या संघटनेचे नेते मौलाना मोहम्मद इस्माईल यांच्यावर हल्ला केला.
-
अमेरिकेचे ऐकून इस्रायल गाझामधून माघार घ्यायला तयार होईल का?
हमासने गाझामधील शस्त्रे आत्मसमर्पण करण्यास सहमती दर्शवली, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या विजयाचा दावा केला. तथापि, या करारामुळे इस्रायलसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. कराराच्या अटींनुसार, इस्रायलला गाझामधून आपले सैन्य टप्प्याटप्प्याने मागे घ्यावे लागेल आणि पॅलेस्टिनी प्रशासनाकडे सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल.
-
चंद्रपूर शहरातील भिवापूर भागात झरपट नदीचे पाणी शिरलं
चंद्रपूर शहरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसाने आता थोडी उसंत घेतली आहे. पण भिवापूर भागात झरपट नदीचं पाणी काही घरांमध्ये शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित हलवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहेत.
-
राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट, अमित साटम यांची घणाघाती टीका
राज ठाकरे यांनी सिद्धीविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहार प्रकरणावर ठपका ठेवला. कार्यकर्त्यांना संबोधिक करताना त्यांनी एक पत्र वाचून दाखवलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. असं असताना भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे फक्त मिमिक्री आर्टिस्ट, स्टँड अप कॉमेडियन असल्याचं टीका त्यांनी केली.
-
पत्रामध्ये अर्ध सत्य, मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया
सिद्धीविनायक मंदिरात कथित गैरव्यवहार प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बोट ठेवलं. त्यानंतर मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया आहे. पत्रामध्ये अर्ध सत्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट यावा, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
-
चिन्ह मिळालं नाही, तर गोठवलं जाईल- उद्धव ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी कोर्टात चिन्ह मिळण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. जर चिन्ह मिळालं नाही, तर गोठवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. 2022 पासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरून कोर्टात खटला सुरू आहे.
-
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100 टक्के भरलं
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100 टक्के भरलंय…धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे…सततच्या पावसामुळे नदीला पूर आला असून अंजनी नदीने रौद्ररूप धारण केलंय…
-
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडीत धावत्या सिमेंट टँकरला भीषण आग
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे शनिवारी सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या सिमेंटच्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरवरील ब्लोअर तसेच अग्निशामक यंत्रांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
-
बीड गोल्डन ट्रँगल परिसरात तरुणांना टार्गेट पुर्ण न झाल्याने करंट देऊन अमानुष मारहाण
म्यानमार-थायलंड-लाओस या तीन देशांच्या सीमेलगतच्या गोल्डन ट्रँगल परिसरात महाराष्ट्रातील 25 ते 30 तरुणांना ओलीस ठेवल्याचा प्रकार बीडमधील ज्या तरुणामुळे समोर आला त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी सरकारकडे आमच्या व्यक्तीला सुखरूप आणावे अशी विनंती केली आहे. दरम्यान काल त्याच्याशी फोनवरून बोलणं झालं त्यांच्याकडून ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जाते, टार्गेट कंप्लीट न झाल्याने त्याला करंट देऊन अमानुष मारहाण केली, जेवण दिले जात नाही, त्याच्या जीवितास धोका आहे तरी सरकारने त्याला सुखरूप आणावे अशी विनंती केली आहे.
-
अमळनेर येथील बाजार समितीमध्ये पावसामुळे मालाचे नुकसान
जळगावच्या अमळनेर येथील बाजार समितीमध्ये पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे तब्बल 15 ते 16 हजार क्विंटल धान्यादी मालाचे नुकसान. पुराच्या पाण्यामुळे बाजार समितीतील संरक्षण भिंत पडल्याने गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी, मका अशा 15 ते 16 हजार क्विंटल एवढ्या धान्याचा माल पूर्णपणे भिजला असून मोठे नुकसान झाले आहे.
-
अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आज अमरावती दौऱ्यावर
तुकाराम मुंढे अमरावतीत दाखल झाले. अमरावतीत दाखल होताच अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. सायंकाळी 5 वाजता पोटे कॉलेजमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. तुकाराम मुंढे अमरावतीत दाखल झाल्यामुळे अनेक ठिकाणी गुटखा विक्री, हॉटेल्स बंद होत्या. आज दिवसभर तुकाराम मुंढे अमरावतीत राहणार असल्याने काही कारवाई करतात का, किंवा कुठे तपासणीसाठी जाणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
-
तरुणांमध्ये टिळकांनी राष्ट्र चेतना निर्माण केली- अजित डोवाल
तरुणांमध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्र चेतना निर्माण केली. विपरीत परिस्थितीत त्यांनी बंडाचे निशाण फडकवले. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. स्वातंत्र्य लढ्यात आवाज उठवणारे टिळक होते असे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल म्हणाले.
-
सातपुड्याला जोडणाऱ्या चांदसैली घाटात दरड कोसळली
सातपुड्याला जोडणाऱ्या चांदसैली घाटात काल कोसळलेली दरड अद्याप हटवण्यात आलेली नाही आहे. वळण रस्त्यावर भला मोठा दगड कोसळल्याने दरड हटवण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. घाटात सध्या तात्पुरत्या स्वरूपात एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आला आहे. रस्त्यावर दरड असल्यामुळे दळणवळणासाठी नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. भला मोठा दगड हटवण्यासाठी आणखी २ ते ३ दिवसांचा कालावधी लग्नाची शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच घाटमार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
देश सांस्कृतिक राष्ट्रवादावर चालत आहे- अमित शाह
टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवयंती सुरू केली. देशाला कोणत्या मार्गाने जायचं याची दिशा दिली. हा देश जेव्हा स्वातंत्र्य होईल, तेव्हा याच मार्गावर चालेल. त्यांची दुरदृष्टी पाहा. देश आज सांस्कृतिक राष्ट्रवादावर चालत आहे. आता त्याला कोणी मागे खेचणार नाही. टिळक शिक्षक होते. प्रखर पत्रकार आहेत. ते निर्भिड होते. मोठे चिंतक होते. त्यांनी भारताची आत्म आणि विवेक जनतेसमोर आणण्याचं काम केलं, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
-
टिळकांचे स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान
लोकमान्य टिळकांचे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान आहे, असे अमित शाह म्हणाले. तर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य क्षेत्रात मोठं योगदान आहेत. दीड दिवस ते शाळेत गेले होते. ते विद्यार्थी आणि शिक्षकही होते असे शाह म्हणाले.
-
अण्णा भाऊ साठे यांनी सर्वांसाठी कार्य केलं -आमदार देवयानी फरांदे
हा समिती उत्सव करत असताना अण्णा भाऊ साठे यांनी सर्वांसाठी कार्य केलं .या शोषित वंचित समाजाचा कार्यक्रम होत असताना सुहास फरांदे आजारी आहेत त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली नाही त्यांनी आज या कार्यक्रमासाठी हट्ट धरला या पुतळाचे काम करताना मला अनेक अडचणी देखील आल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या साठी निधी नसेल तर महापालिकेला टाळे लावले पाहिजे असे मी सांगितले , असे आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या.
-
अजित डोवाल हे खऱ्या आयुष्यातील धुरंधर
अजित डोवाल हे भारताचे जेम्स बाँडच नाही तर धुरंधर आहेत. जेम्स बाँड आता जुना झाला. ते खऱ्या आयुष्यातील धुरंधर आहेत. राष्ट्र सुरक्षेसाठी देश त्यांना ओळखतो. डोवाल यांचं सर्व जनतेकडून अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-
डोवाल यांना शाहांच्या हस्ते पुरस्कार हा दुग्धशर्करा योग – एकनाथ शिंदे
शाहांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदार करण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, डोवाल यांना शाहांच्या हस्ते पुरस्कार हा दुग्धशर्करा योग आहे. अजित डोवाल यांचे सर्व जनतेच्या वतीने अभिनंदन…
-
मोदी म्हणतात मुलं चुकीच्या रस्त्यावर भरकटले – राज ठाकरे
मोदी म्हणतात मुलं चुकीच्या रस्त्यावर भरकटले आहे. मी ओशोचं वाक्य वाचलं होतं. कौन कहता है इस देश युवक गलत रास्ते पर भटक गया है. रास्ता बनाने वालो नेही गलत रास्ता बनाया है, तो युवकों को क्यों टोकते हो. ते चुकीच्या रस्त्यावर नाही. त्यांच्या आशा आकांक्षा मारल्या जात आहेत. मोदी म्हणाले, ज्यांनी ट्रोल केलं, त्यांना माफ करतो. आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची कोण माफी मागणार? असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
-
पेपरफुटीनंतर जीवन संपवलं त्यांच्या पालकांची माफी कोण मागणार? – राज ठाकरे
नीट पेपरफुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं… यावर राज ठाकरे म्हणाले, पेपरफुटीनंतर जीवन संपवलं त्यांच्या पालकांची माफी कोण मागणार? आपण करतो काय, देश चाललाय कुठे, कशाचाही विचार नाही… असे प्रश्न राज ठाकरे यांनी व्यक्त केले..
-
मोदींची भूमिका साकारणार दुबईला राहायला गेला – राज ठाकरे
ज्याने मोदींवर सिनेमा काढला. मोदींची भूमिका केली. तो दुबईला राहायला गेला. तो दुबईचा नागरिक आहे. मोदींनी उद्योग आणले. देशासाठी काय काय करतात अशी मुक्ताफळे उधळणारा आर माधवन कुठे राहतो. तो दुबईत स्थायिक झाला. त्यांना देशावर प्रेम आहे. मोदींवर विश्वास आहे. विकासावर विश्वास आहे तर परदेशात का राहतात. कुटुंबासोबत राहतात. इथे येतात स्पॉन्सर्ड फिल्ममध्ये काम करणार. धुरंधर बिरंदर आणि परदेशात जाऊन राहणार. ही लोकं परदेशात जात आहे… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
-
मुलं परदेशात का जात आहेत, कारण सभोवतालचं वातावरण – राज ठाकरे
मुलं परदेशात का जात आहेत. कारण सभोवतालचं वातावरण. घरातून बाहेर पडल्यावर आनंद मिळाला पाहिजे. बागा सुंदर आहे. फुटपाथ चांगल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला वाव आहे, असं वातावरण आहे. चित्रकार आणि खेळाडू ग्रामीण भागात आहेत. वावच नाही. काय करायचं पुढे माहीत नाही. कुणाला भेटायचं माहीत नाही. हे साचलेलं बाहेर येत आहे. नीटचा राग आहे. पण हे जे साचून ठेवलंय. त्याचं काय करणार आहात… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.
-
आपली शहरी राहण्यायोग्य आहे का इथून सुरूवात – राज ठाकरे
उलटा उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठून येतात मग…. या गोष्टीचा उद्रेक बाहेर येतोय. अजून येणार हा विषय कुणाला सत्तेवर खेचणं आणि कुणाला तरी सत्तेवर आणणं एवढा विषय नाही. हा देशाचा विषय आहे. देशाच्या भविष्याचा विषय आहे. तरुणांचा विषय आहे. काय होणार आहे त्यांचं… देशाच्या ग्रामीण भागातील तरुण तरुणी काय करत असतील. काय विचार करत असेल. माझ्या बाजूच्या घरातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या अंत्यविधीला जाणार. विचार काय करणार माझ्या वडिलांनी करू नये. मी शहरात गेलं पाहिजे. नोकरी केली पाहिजे. पण नोकरी कुठून मिळणार. कुठे राहणार. आज शहराची परिस्थिती बघा. स्मार्ट सिटी करणार होते. कुठे आहे. रस्ते पूल याला आपण विकास म्हणतोय. आपली शहरी राहण्यायोग्य आहे का इथून सुरूवात आहे… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं…
-
एकाच उद्योगपतीवर मेहरबानी सुरू आहे. देशात फक्त निवडणुका सुरू आहेत – राज ठाकरे
मुलांना खेळायला मैदान नाही. बाहेर कुठे जाता येत नाही. शिक्षण झालं, नोकऱ्या नाही. कंपन्या खासगी लोकांना दिलं जात आहे. एकाच उद्योगपतीवर मेहरबानी सुरू आहे. देशात फक्त निवडणुका सुरू आहे. आमदार खासदार फोडले जात आहेत. तुमच्याकडचे पैसे डीजिटलाईज केले. आमदार खासदार फुटतात तेव्हा कार्ड कुठे स्वाईप करतात… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
-
तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुम्हीही मर्यादा पाळा – राज ठाकरे
मनापासून सांगतो. पंतप्रधानांना सांगतो दुसऱ्यांनाही आया असतात. तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुम्हीही मर्यादा पाळा. मोदी म्हणतात त्या मुलांना माफ केलं. पण १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार. जंतरमंतरवर डोकी फोडली. त्याचे आदेश देणारे कधी माफी मागणार… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं
-
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत – राज ठाकरे
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून पुण्यात पाठवलं. शिक्षणाचं माहेरघर आहे. तिथेही काही झालं नाही. असे शिक्षणमंत्री म्हटल्यावर जेन झींचा पारा चढणार की नाही चढणार.अशी माणसं आमच्या नशिबी आणून ठेवली आहे…. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
-
मी ज्यावेळी काम सुरु केलं तेव्हा काळ वेगळा होता, आताचा वेगळा आहे – राज ठाकरे
मी ज्यावेळी काम सुरु केलं तेव्हा काळ वेगळा होता, आताचा वेगळा आहे, आताचे विषय वेगळे आहेत. इंग्रजी बोलणारे फक्त जेनजी नसतात. माझे विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे. ९७ नंतर जन्माला आलेली मुलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. मुंबई, पुणे दिल्लीचे फक्त जेनजी नाहीत. या मुलांच्या अपेक्षा काय आशा काय यांना काय हवं. ही गोष्ट समजून घेणं गरजेची आहे. जुन्या कल्पना होता. त्याही आता सोडून दिल्या पाहिजे… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं…
-
जळगाव शहरातील नाल्यांची सकाळपासून महापौर दीपमाला काळे तसेच उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून पाहणी…
जळगाव शहरात दोन दिवसात सततच्या पावसामुळे नाल्याला मोठा पूर येऊन अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. जळगाव शहरातील बिबानगर, सुप्रीम कॉलनी तुकाराम वाडी , ममुराबाद या ठिकाणच्या नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शिरले होते. प्रत्येक ठिकाणच्या नाल्याची सकाळपासूनच महापौर तसेच उपमहापौर यांच्याकडून पाहणी केली जात असून कारणांचा शोध घेतला जात आहे. नाल्यांचे पाणी घरांमध्ये शिरण्यामागचे तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन त्या कायमस्वरूपी दूर करण्याचे नियोजन असल्याचा महापौरांनी सांगितलं.
-
भर पावसात विजेच्या खांबावर चढून वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचे ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकरांकडून कौतुक
जालन्याच्या भोकरदन शहरात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालेला होता याची दखल घेत महावितरणचे कर्मचारी दीपक देवरे यांनी भर पावसात विजेच्या खांबावर चढून वीज पुरवठा सुरळीत करून कर्तव्य तत्परता दाखवली होती, त्यानंतर या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दीपक देवरे यांना व्हिडिओ कॉल करून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं शिवाय वीज पुरवठा संदर्भात काम करताना नेहमी सुरक्षा साधनांचा वापर करून सुरक्षित राहण्याचा सल्ला बोर्डीकरांनी यावेळी दिलाय…
-
अमित शाह यांच्याकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन
अमित शाह यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अमित शाह यांनी कार्यक्रमाआधी पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर कार्यक्रमासाठी रवाना झाले.
-
सुनेत्रा पवार यांनी घेतली अमित शहा यांची भेट
पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात स्थान द्यावे, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत.
-
अमित शाह हॉटेलमधून पुण्यातील कार्यक्रमासाठी रवाना
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हॉटेलमधून पुण्यातील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. पुण्यात टिळक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी अमित शाह रात्रीच पुण्यात आले. त्यानंतर रात्री एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर आता या हॉटेलमधून कार्यक्रमासाठी रवाना झाल्याचं समोर आलं आहे.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा स्वागत बॅनर काढला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागताचे ‘चाणाक्य’ नावाचे बॅनर काढले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर टीका झाली. त्यानंतर बॅनर काढल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर असून काँग्रेसने आंदोलनाचा नारा दिला आहे.
-
पुण्यातील काँग्रेस भवनासमोर भाजपचं आंदोलन
पुण्यातील काँग्रेस भवनासमोर भाजपचं आंदोलन सुरू आहे. काँग्रेसने अमित शहा यांच्या विरोधात आंदोलनाचा नारा दिला. त्यानंतर आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर भाजपने थेट काँग्रेस भवनासमोर जाऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली.
-
धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; मुदतवाढीनंतरही अल्प प्रतिसाद
धाराशिव जिल्ह्यात पीक विमा योजनेला यंदा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असली, तरी ३१ जुलैपर्यंत केवळ २ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे.विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत ४ लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यामुळे यंदा अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत आहे.
-
माजी युवक शहराध्यक्ष राहुल शिरसाट यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेसकडून इशारा देण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, माजी युवक शहराध्यक्ष राहुल शिरसाट याना विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतलं
-
UPSC चा पेपरफुटत नाही मग नीटचा कसा फुटतो- सुप्रिया सुळे
नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजत आहे. त्यामध्येच आता मोठी माहिती पुढे येत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात आता सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, UPSC चा पेपर फुटत नाही नीटचा पेपर कसा फुटतो
-
नाशिकमध्ये गाडी स्लिप होऊन आणखी एक बळी खड्डा आणि गाडी स्लीप होऊन 6 वा बळी
नाशिकच्या नांदूरनाका-माडसांगवी रस्त्यावर झाला अपघात. दुचाकी घसरून २६ वर्षीय किसन झाकणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू. नाशिकमध्ये खड्डे आणि चिखलामुळे रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था तर एकाच दिवसात १२ जण जखमी शहरातील विविध भागांत दुचाकी घसरून अपघातांची मालिका. शहरातील अनेक भागांत अपघात त्र्यंबकेश्वर रोड, महिंद्रा सर्कल, सातपूर व मखमलाबाद भागात नागरिक जखमी
-
चिकुर्डे येथील वारणा नदीवरील बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली पाणलोट परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे वारणा नदीच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीवरील बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली
चांदोली (वारणा) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. -
नाशिकमध्ये खड्ड्याचा आणखी एकाचा मृत्यू, बळींची संक्या 6 वर
नाशिकमध्ये खड्ड्याने आणखी एकाचा मृत्यू झाला असून आत्तपर्यंत 6 जणानी जीव गमावला आहे. नाशिकच्या नांदूरनाका-माडसांगवी रस्त्यावर अपघात झाला. दुचाकी घसरून 26 वर्षीय किसन झाकणे यांचा अपघात झाला होता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाशिक मध्ये खड्डे आणि चिखलामुळे रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. शहरातील विविध भागांत दुचाकी घसरून अपघातांची मालिका सुरूच असून एकाच दिवसात 12 जण जखमी झालेत.
-
अमित शाह रात्रीच्या अंधारात पुण्यात आले- संजय राऊत
नुकताच संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शाह रात्रीच्या अंधारात पुण्यात आले. ते कोणाला घाबरतात, असाही सवाल यादरम्यान त्यांनी उपस्थित केला.
-
मोदी दिवसा व्हिडीओ पोस्ट करायला घाबरतात- संजय राऊत
नुकताच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, मोदी दिवसा व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी घाबरतात.
-
जळगावच्या चोपडा तालुक्यातील अनेर धरणाचे 10 दरवाजे दोन मीटर पर्यंत उघडले
जळगावच्या चोपडा तालुक्यातील अनेर धरणाचे 10 दरवाजे दोन मीटर पर्यंत उघडले. अनेर धरणाच्या उगम स्थळी जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. धरणाच्या दहा दरवाजांमधून 45 हजार क्युसेस पाण्याच्या नदीपात्रात विसर्ग करण्यात आला . दोन दिवसांच्या सततच्या पावसाने तालुक्यातील नदी नाल्यांना पूर, त्यामुळे धरण ओसंडून वाहत आहे.
-
बीड – येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी
बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली एकमेकींना शिवीगाळ करत पाय तोडण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांच्या दोन गटात हा वाद झाला असून त्याचा चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र पोलिसात तक्रार दिली नसल्याने अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अहिल्यानगर येथे नगरसेवकांसोबत बैठक
अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नगरसेवकांसोबत बैठक झाली. आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट झाली. महानगरपालिकेच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली तसेच रखडलेल्या विकासकामांचे निवेदन नगरसेवकांनी सुनेत्रा पवार यांना दिले. निधीअभावी शहरातील अनेक विकासकामे मंदावल्याचे नगरसेवकांचे म्हणणं आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.
-
छत्रपती संभाजीनगर मनपाच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
छत्रपती संभाजीनगर मनपाच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. भाजपच्या 7 तर एमआयएमच्या 16 नगरसेवकांचा समावेश आहे. पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनाने कारवाई करत बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि इतर कारणांवरून नोटिसा पाठवल्या. नगरसेवकांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार असून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार आहे.
-
कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही रस्त्यांची चाळण; नागरिकांचा संताप
कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही रस्त्यांची चाळण झाली आहे. डोंबिवली स्टेशन ते गणेशनगर , गरीबांचा वाडा मार्गावरील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांनी नागरिक, वाहनचालक हैराण झालेत. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. करोडो रुपयांचा ठेका देऊन अर्धा पावसाळा उलटला तरी डागडुजी नाही ; केडीएमसीच्या कामकाजावर नागरिक संतापले आहेत.
-
मुंबई आग्रा महामार्गावर गेल्या 12 तासापासू मोठा ट्रॅफिक जॅम
मुंबई आग्रा महामार्गावर गेल्या 12 तासापासून मोठा ट्रॅफिक जॅम झाला असून जाम मध्ये अडकलेले वाहन चालक त्रस्त झालेत. संपूर्ण रात्र महामार्गावर काढावी लागल्याने अनेक कुटुंबांचे हाल होत आहेत. महामार्ग वाहतूक शाखेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
-
कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास मंजुरी
भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास दिली मंजुरी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन
पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वाहतुकीला होणार फायदा
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश
-
लासलगावजवळ अनुदानित युरिया खताचा काळाबाजार उघड
लासलगावजवळ अनुदानित युरिया खताचा काळाबाजार उघड
जिल्हा परिषद कृषी विभाग व लासलगाव पोलिसांचा संयुक्त छापा
761 युरिया खताच्या गोण्या, ट्रक व आयशर टेम्पोसह 84 लाखांचा मुद्देमाल जप्त
चार संशयित पोलिसांच्या ताब्यात
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोहित टिळक यांच्या लोकमान्य टिळक ट्रस्ट कडून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान भाजप नेते विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली असून विजय चौधरी यांचा स्वीय सहाय्यक यश टिपरे पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तर बंद घराची रेकी करून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, राजकारण या सर्व क्षेत्रांतील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.