Maharashtra News LIVE: नसरापूर अत्याचारप्रकरणी ग्रामस्थांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Maharashtra News LIVE: अंगारकी चतुर्थी निमित्ताने आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनसाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अंगारकी चतुर्थी निमित्ताने लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळतंय.

LIVE NEWS & UPDATES
-
धाराशिवमध्ये तीन दिवसांपासून डिझेलची टंचाई
धाराशिव जिल्ह्यात वाशी आणि कळंब परिसरामध्ये गेले तीन दिवसापासून डिझेलची टंचाई असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपावर लागले डिझेल संपलेचे बोर्ड. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतातील कामे ठप्प झाली आहेत.
-
महापौर रितू तावडेंनी केली नाल्यांच्या सफाईची पाहणी
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज सकाळ पासून मुंबई उपनगरातील विविध नाल्यांच्या सफाईची पाहणी केली.भांडुप, मुलुंड, घाटकोपर, साकीनाका परिसरातील महत्त्वाच्या नाल्यांवर आज महापौर अधिकाऱ्यांसह पोहचल्या आणि किती टक्के नालेसफाई झाली आहे याची माहिती त्यांनी घेतली.या वेळी त्यांनी नालेसफाई सह विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
-
-
पुण्यातील नसरापूर घटनेच्या साक्षीदाराचे जबाब नोंदवण्यास सुरुवात
पुण्यातील नसरापूर घटनेच्या साक्षीदाराचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली असून पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने महत्त्वाच्या व्यक्तीची जबाब नोंदवून घेतले आहेत. विशेष तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज विविध तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. नराधमा आरोपी भिमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
-
नसरापूर घटनेतील नराधम आरोपी भीमराव कांबळेची तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी पूर्ण
पुण्यातील नसरापूर घटनेतील नराधम आरोपी भीमराव कांबळेची तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली. ससून रुग्णालयात आरोपीची सक्षमता तपासणी करण्यात आली आहे. तपास जलद गतीने करायचा असल्याने सक्षमता तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याचा पोलिसांच्या सूचना आहेत. हा अहवाल लवकरात लवकर द्यावा अशी मागणी पोलिसांनी रुग्णालयाकडे केली आहे.
-
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळविण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळविण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षात आमदार महेश शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यताआहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडल्याचा महेश शिंदे यांच्यावर आरोप असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाविरोधी विधान किंवा कृती सहन केली जाणार नाही, असाही इशारा देण्यात आला आहे.
-
-
जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमानसेवेवरदेखील मोठा परिणाम
जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमानसेवेवरदेखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विमानसेवा सुरळीत राहावी यासाठी विमान कंपन्यांकडून प्रवासी संख्या कपात करण्यात आल्याची माहिती विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली. वाढत्या उष्णतेमुळे हवामान कोरडं होऊन वातावरणातील हवेचा दाब कमी झाल्याने विमान उड्डाण करण्यासाठी अडचणी येत आहेत.
-
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणात पाच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणात पाच आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. नाशिक न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यासह चार जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. व्हिआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
-
मुंबई-सातारा हायवे मार्गावरील आंदोलनाबाबत पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण
भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणानंतर शनिवारी सायंकाळी नवले पुलाजवळ मुंबई-सातारा मार्गावर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यामुळे वाहतूक चार तास ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलक आणि पीडितेच्या कुटुंबीयांशी चर्चा केली, मात्र काही जण आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अनेकजण वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. अखेर सौम्य बळाचा वापर करावा लागला, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
-
हत्तीपाय रोगाचा पुण्यात शिरकार; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात 44 रुग्ण
विदर्भातील जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या हत्तीपाय रोगाचा शिरकाव आता पुण्यातही झाला आहे. जिल्ह्यात एकूण 44 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधील रुग्णांचा समावेश असून बहुतांश रुग्ण इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झाले आहेत.
-
नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडात आढळला मोजा; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर
नसरापूर इथं साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात मोजा कोंबल्याच तसेच छातीवर वळ उमटल्याचं शवविच्छेदन करताना निदर्शनास आलं. ससून रुग्णालय प्रशासनाने शविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे. नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या बालिकेवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणावरून ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे याला मृत्युदंड (फाशी) व्हावा, अशी मागणी करणारं निवेदन देण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं आहे की, या प्रकरणात दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आरोपीला लवकरात लवकर फासावर चढवण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून खटला चालवण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग..