
भाजपच्या पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज अमरावतीत प्रशिक्षण कार्यशाळा आहे. भाजपच्या प्रशिक्षण कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती ,यवतमाळ बुलढाणा वाशिम ,अकोला या पाचही जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण मेळाव्याला हजर राहतील.
छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने मध्यरात्री साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून 2 लाख 38 हजार 789 रुपयांच्या साड्या चोरी केल्या. चोरट्याची ही कृती CCTV मध्ये कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बामर्डा रेती घाटातील पैशांच्या वादातून भरत नागपाल या युवकाची निघृण हत्या करण्यात आली होती. या वाळूमाफियांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. संघटित टोळी बनवून दहशत निर्माण करणाऱ्या अमोल कामडी आणि त्याच्या ११ साथीदारांवर ही कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याणच्या यूपीएससी परीक्षेत पारस मेस्त्री आणि प्रणव बेंढारी यांचे नेत्रदीपक यश
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निकालात कल्याणच्या दोन सुपुत्रांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. पारस मेस्त्री आणि प्रणव बेंढारी यांनी या कठीण परीक्षेत यश संपादन केले आहे. या दोघांच्या यशामुळे कल्याण शहराचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर उज्ज्वल झाले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी कल्याणकरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, या गुणवंतांच्या यशाची दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्याच्या अनेक भागांत एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ झाल्याने आणि गॅस उपलब्ध नसल्याने मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास शहरातील ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावरही दिसू लागला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलेला निर्यात कोटा जवळपास ठप्प झाला आहे. निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारात साखरेची आवक वाढली असून साखरेचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी सुमारे ३७०० रुपये प्रति क्विंटलने विकली जाणारी साखर आता जवळपास ३२०० रुपयांवर आली आहे. दर घसरल्यामुळे याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उसाच्या हमीभावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगावातील पोलिसांच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षक याच्यासह त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. दक्षता पेट्रोल पंप येथे १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अपहरण, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे 20 दिवसांपासून पीएसआय वाल्मीक वाघ हा फरार झाला होता. आता पीएसआय वाल्मीक वाघ स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरण आला असून त्यांची पोलिस अधीक्षक , तपासाधिकारी यांनी चौकशी केली. पोलिस उप निरीक्षकाच्या मुलाच्या बँक खात्याचाही सहभाग समोर आल्याने त्यालाही ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट अमरावतीच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरतेमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे नागरिकांना आता बुकिंगनंतरही सिलिंडरसाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. या टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. गॅस एजन्सींनी त्यांना अतिरिक्त सिलिंडर पुरवणे बंद केले आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत पुरवठा अधिक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने एजन्सींकडून व्यावसायिकांना गॅस जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढती महागाई आणि सिलिंडरची अनुपलब्धता यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
अपंगांच्या टक्केवारी नुसार प्रतिमहा अनुदान, व्यवसाय कर्ज, अपंग खेळाडूंना प्रोत्साहन अनुदान, आजारी व्यधिग्रस्ताना आर्थिक अर्थसहाय्य, मेळावे, भवन निर्मितीची अर्थसंकल्पात तरतूद. अपंगांच्या विविध योजनांमधून लाभ देण्यासाठी सण 2026-2027 च्या अर्थसंकल्पात 18.88 कोटी रुपयांची तरतूद
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर बनावट अपघाताचा बनाव करून विमा रक्कम उकळण्याचा प्रकरा समोर आला होता. या प्रकरणात तालुका वैद्यकीय अधीक्षक, चार पोलीस कर्मचारी व इतर आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ५० लाखांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला आहे.
बीडच्या पाडळसिंगी येथील धुळे-सोलापूर महामार्गावरील टोलनाक्यावर तांत्रिक अडचणींमुळे काही लेन बंद असल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारकांना टोल पास करण्यासाठी 8 ते 10 मिनिटं ताटकळत थांबावे लागत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलनाक्यावर अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे दोन लेन बंद असल्याचे टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तीन दिवसात एलपीजी गॅस दरवाढीचा भडका दर 61 वरून थेट पोहोचले 75 रुपये प्रति लिटरवर. दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत, भाडेवाढीची शक्यता. सरकारने ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवर तोडगा काढावा रिक्षा चालकांची मागणी.
वसई विरार महापालिकेत पाणीपट्टीत दुपटीने तर घरपट्टीत 13 टक्क्याने वाढ करण्यात आली. पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 731.85 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्थायी समितीकडे सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरतूद केली. पाण्याचे वितरण, पाईप लाईन दुरुस्ती, जलकुंभ उभारणे, जलवाहिन्या बदलणे, पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण, विस्तारीकरण, मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यावर भर असणार आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडर वाढल्याने मिसळचे दर देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यावसायिक गॅस काल 2200 रूपये तर आज 2400 रुपये झाले आहे. पैसे देऊन देखील गॅस पुरवठा सुरळीत नसल्याने हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. दररोज गॅसचे दर वाढत असल्याने हॉटेल चालकांची डोकेदुखी वाढली आहे.
घर वा मालमत्ता खरेदी नोंदणीच्या वेळी मुद्रांक शुल्काची योग्य आणि निश्चित रक्कम न भरल्यास यापुढे एक लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दंडाची रक्कम यापूर्वी ५ हजार रुपये एवढी होती. मात्र, राज्य सरकारने त्यात २० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेत २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात तरतूद प्रस्तावित केली आहे. या निर्णयाला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर स्थिती आहे. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय देखील कुवेतमध्ये अडकला होता. विखाशा सुभेदार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी सरकारकडे विनंती केली होती. यानंतर राज्य सरकार त्यांच्या मदतीला धावलं होतं. विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत विरोधकांची दोन मते अवैध ठरल्यामुळे भाजपच्या नगरसेविका साक्षी दळवी यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. महानगरपालिकेच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी १७ प्रभाग समित्यांपैकी एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन तसेच एस आणि टी या पाच प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 हजार 98 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. बदलापूरच्या नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी 11.76 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. महत्वाचं म्हणजे मालमत्ता करात 50 टक्के सवलत आणि नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेसारख्या महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सुकन्या योजनेच्या माध्यमातून बदलापुरात जन्माला येणाऱ्या मुलीचं स्वागत केलं जाईल. तिच्या नावाने 5 हजारांची ठेव ठेवण्यात येईल, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठेवीचा शिक्षणासाठी उपयोग करता येईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी सांताक्रुझ- चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाअंतर्गत वाकोला ते वांद्रे-कुर्ला संकुल उड्डाणपुलाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पूल सेवेत दाखल झाल्यास बीकेसी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा प्रवास अतिजलद होईल.
शेवटचा बीकेसी ते वाकोला उड्डाणपूल अद्याप सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन आणि बीकेसी जंक्शन येथे पोहोचणे सोपे व्हावे यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन मार्गिकांचा आणि सुमारे ६४५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यास बीकेसीतून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणे सोपे होईल.
शनिमांडळ ते नंदुरबार मार्गावर धावणारी बस क्रमांक MH 14 BT 1801 ही रात्रीच्या वेळी विना हेडलाईट रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले. ६० ते ७० किमी वेगाने अंधारात बस धावत असल्याने महामंडळाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. हेडलाईट बंद असतानाही बस वेगाने धावत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे का? असा प्रश्न उपस्थित. समोरून येणाऱ्या वाहनांना बस दिसणे कठीण होत असल्याने प्रवासी व वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला…..
निवडणूक होऊनही मीरा-भाईंदर फेरीवाला समिती ‘कागदावरच’ आहे. अजूनही समिती स्थापन करण्यात आलेली नाही. ५ महिन्यांपासून राज्य शासनाकडून अधिसूचनेची प्रतीक्षा केली जातेय. पालिका आयुक्तांसह ७ सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. समिती रखडल्याने पालिकेच्या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
नाशिक – महसूल विभागातून २३ वर्षांपूर्वी गहाळ झालेली फाईल सापडली. त्र्यंबक रोडवरील पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणाची ही फाईल होती. २००३ मध्ये तहसील कार्यालयातून फाईल गहाळ झाली होती. माहिती अधिकारातून कागदपत्रे मागवली होती, मात्र फाईल गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं होतं. राज्य माहिती आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर कारवाई सुरू झाली होती. फाईल गहाळ झाल्याचा सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर सोमवारी प्रतिबॅरल 120 डॉलरपर्यंत पोहोचलं. याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. रुपयाही आता नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाणार नाही, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. तर साठेबाजी रोखण्यासाठी घरगुती एलपीजी सिलेंडर नोंदणीसाठी किमान प्रतीक्षा कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान इराणबरोबरील युद्ध थांबविण्याचा निर्णय नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. अशातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इराणला पाठिंबा दिला. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.