Maharashtra News LIVE : अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार? गुन्हा दाखल करण्याची मनोज फलकेंची मागणी
Maharashtra News LIVE Updates : राज्यात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. केंद्र शासनाकडून तुटवडा भरून काढण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. इराण अमेरिका युद्धाचा परिणाम भारतावर होताना दिसत आहे.

इराण अमेरिका युद्धाचा थेट फटका भारतीय लोकांना बसत आहे. देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला. यासोबतच गॅसच्या किंमतीमध्येही मोठी वाढ झाली. हॉटेल व्यावसायिक मोठ्या संकटात आहे. केंद्र शासनाकडून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्याने छोट्या हॉटेल चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आमचे हॉटेल चालू राहिले तरच आमच्या घरातली चूल पेटते म्हणत सरकारला छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडून गॅस पुरवठा करण्याची विनंती केली जात आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी थेट चुली सुरू केल्या आहेत. काल केंद्रीय मंत्रिमंडळाची गॅस टंचाईच्या मुद्दयावर बैठक झाली. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार? गुन्हा दाखल करण्याची मनोज फलकेंची मागणी
अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज फलके यांच्याकडून करण्यात येत आहे. एका टेम्पोमध्ये तब्बल ४० ते ५० गॅस सिलेंडर आढळले. कुठलाही प्रकारचा परवाना नसताना देखील टेम्पो मधून गॅस सिलेंडर आढळले. सिलेंडरच्या वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचा वैध परवाना नसल्याच मनोज फलके यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मनोज फलकेंनी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता शिवाजीनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
-
दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर खड्ड्यांच साम्राज्य, काँग्रेस आक्रमक
दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर काँग्रेसची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल माणिकराव ठाकरे टोल विरोधात आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने टोल नाक्यावर तोडफोड केली. ठाकरेंच्या नेतृत्वात टोल वसुली करू न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळच्या दारव्हा ते कारंजा मार्गावर भांडेगाव-भुलाई परिसरातील टोलनाक्यावर टोल वसुली केली जाते. रस्त्यावर खड्डेच खड्डे असतानाही टोल वसुली कशासाठी केली जातेय? असा प्रश्नही काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला.
-
-
108 माओवाद्यांना मोठी रक्कम ,शस्त्र-1 किलो सोन्यासह आत्मसमर्पण
108 माओवाद्यांना रोख रक्कम देण्यात आली आहे. शस्त्र आणि 1 किलो सोन्यासह माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. पहिल्यांदाच माओवाद्यांनी संपत्तीसह समर्पण केलं आहे. माओवाद्यांनी 3.30 कोटीची रोख रक्कम आणि एक किलो सोन्याचे दागिने छत्तीसगड पोलिसांच्या स्वाधीन केलं. डी वाय सी के एम याच्या नेतृत्वात असलेले हे 108 माओवाद्यांनी छत्तीसगड राज्यातील जगदलपूर इथे आत्मसमर्पण केलं. यात जवळपास 44 महिलांच्या समावेश आहे.
-
मेंढपाळाला अमानुष मारहाण, लक्ष्मण हाके आक्रमक
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पुसरा गावात मेंढीचा दुचाकीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून मेंढपाळाला काठीने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळावर झालेल्या या हल्ल्यामुळे मेंढपाळ समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
युद्धाचा फटका, वसई -विरारमध्ये गॅसचा तुटवडा
आता पालघर जिल्ह्यातही युद्धाचा फटका
वसई -विरारमध्ये गॅसचा तुटवडा
हॉटेल व्यवसायिक चिंतेत
हॉटेलमध्ये पेटविली चूल
ग्राहकांना चुलीवरच जेवण
-
अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याला भेगा, अनेक ठिकाणी रस्ता खचला
अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मध्यभागात मोठ-मोठ्या भेगा पडल्या असून, अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. मांजरसुंबा ते केजदरम्यान भेगा पडल्याने दुचाकीचे अपघात वाढले आहेत. नागरिकांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
-
परभणी- जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच घरगुती गॅस साठा उपलब्ध
परभणी- जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच घरगुती गॅस साठा उपलब्ध
परभणी जिल्ह्याला प्रति दिन 6 हजार 300 सीलेंडरची गरज
पण परभणी जिल्ह्यात 11 हजार 322 सिलेंडरच उपलब्ध
जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांची माहिती
पण आवश्यकते नुसार गॅस उपलब्ध होत असल्याचा मुसळे यांचा दावा
-
बंगालचे माजी राज्यपाल सी.व्ही. बोस यांचे मोठे विधान
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल सी.व्ही. बोस कोलकाता सोडताना म्हणाले, “जेव्हा तुम्ही नोकरी सुरू करता तेव्हा नेहमीच एक बाहेर पडण्याची संधी असायला हवी. मला योग्य वेळी बाहेर पडण्याची संधी मिळाली.”
-
सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव- गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले की, सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव ही सामान्य घटना नाही. जवळजवळ चार दशकांनंतर लोकसभा सभापतींविरुद्ध पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. ही एक खेदजनक घटना आहे. सभापती हा सभागृहाचा असतो, कोणत्याही पक्षाचा नाही, असं सांगत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
-
श्रीरामपूरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेलमध्ये वापर ; 10 सिलिंडर जप्त
श्रीरामपूरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेलमध्ये वापर होत असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी 10 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. हॉटेल दत्त भुवनवर प्रशासनाचा छापा टाकल्यानंतर घरगुती एलपीजीचा व्यावसायिक वापर होत असल्याचं उघड झालं. पोलीस आणि पुरवठा विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली असून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
-
गॅस तुटवड्यामुळे सरकारी कार्यालयांमधील कॅन्टिनला फटका, वडेट्टीवार यांचा दावा
गॅस तुटवड्याचा फटका सरकारी कार्यालयातील कॅन्टिनलाही बसला आहे. काल आमदारांना जेवण मिळालं नाही असं वडेट्टीवार यांनी दावा केला. पण कॅन्टिन सुरू असल्याचा टीव्ही 9 ने रिएलिटी चेक केला आहे. यावेळी कॅन्टिन सुरू असल्याचं दिसून आलं आहे.
-
मनमाड : महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण
नाशिकच्या मनमाड मध्ये महावितरणाच्या कार्यालयात विज बिल कमी करण्यासाठी आलेल्या तरुणांनी वाद घालत चक्क अधिकाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये महावितरणाचे अधिकारी जखमी झाले आहे. याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी विजया पाशिलकर, उपसभापतीपदी संजय मांडलूसकर बिनविरोध
रायगड जिल्ह्यातील रोहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. रोहा पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजया विनोद पाशिलकर या सभापतीपदी तर संजय संभाजी मांडलूसकर हे उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
-
नवी मुंबई : हॉटेल्समध्ये गॅस ऐवजी आता चुलीवर स्वयंपाक
नवी मुंबईच व्यावसायिक गॅसची टंचाई सुरु आहे. नवी मुबंई मधील हॉटेलमध्ये आता गॅस ऐवजी आता चुलीवरती स्वयंपाक होत आहे. त्यामुळे पदार्थ तयार करण्यासाठी अधिकचा वेळ लागत आहे अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.
-
पुणे महापालिकेसमोर शिवसेनेचा हंडा मोर्चा
हडपसर परिसरामधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ तथा पालिका आयुक्त यांचे लक्षवेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या समोर हांडा मोर्चा काढण्यात आला. पाण्याच्या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही कुठलीच ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने आम्ही महापालिकेच्या समोर हंडा मोर्चा काढला आहे असं शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी सांगितले.
-
नाशिकमध्ये दहवीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, पोलिसांकडून तपास सुरू
नाशिक : एका दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरात ही घटना घडली आहे. न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोर ही घटना घडली आहे. दहावीचा पेपर देऊन बाहेर आल्यावर ही घटना घडली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरात वाघांसाठी कुलर, दिवसातून तीन वेळा घातली जातेय अंघोळ
छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानात उन्हाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढत असून उकाड्यामुळे नागरिकांची अक्षरशः लाही-लाही होत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे तर जनावरांवर आणि वन्य प्राण्यांवरही होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सिद्धार्थ उद्यानात प्राण्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी उद्यान प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. विशेषतः उद्यानातील वाघांच्या पिंजऱ्यांमध्ये कूलर बसवण्यात आले असून त्यांना उन्हाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत दिवसातून तीन वेळा थंड पाण्याने अंघोळ घालण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा त्रास प्राण्यांना कमी होण्यास मदत होत आहे.
-
पुणे महापालिकेसमोर शिवसेना शिंदे गटाकडून हंडा मोर्चाचे आयोजन
पुणे : महापालिकेसमोर शिवसेना शिंदे गटाकडून हंडा मोर्चाचे आयोजन केले आहे. हडपसर परिसरातील पाणीटंचाईचा मुद्दा घेऊन शिवसेना शिंदे गटाने हे आंदोलन उभारले आहे. अनेक महिला आंदोलक महानगरपालिकेच्या समोर जमा झाल्या आहेत. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पाण्याची तजवीज करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
-
जाळून घेत शेतकऱ्याची आत्महत्या, नापिकीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
हिंगोली- पऱ्हाटीच्या (कपाशीच्या ) फासावर जाळून घेत शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळमनुरी तालुक्यातील साळवा शेत शिवारात हा प्रकार घडला आहे. दत्तराव माखणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.
-
सोलापुरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीकडून सुरक्षारक्षकाला मारहाण
सोलापुरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीकडून सुरक्षारक्षकाला मारहाण. मारहाणीची घटना संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. गेट न उघडल्याने मध्यरात्री दोनच्या सुमारास मारहाण. विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटमधील प्रकार
-
गॅस पुरवठ्यावर तोडगा निघाला नाही हॉटेल आणि लग्नाचे हॉल रविवारपर्यत बंद होण्याची शक्यता
गॅस पुरवठ्यावर तोडगा निघाला नाही,तर ठाण्यातील हॉटेल आणि लग्नाचे हॉल रविवारपर्यत बंद होण्याची शक्यता. ठाण्यात हॉटेल असोसिएशनची महत्वाची बैठक. रेल्वे स्टेशन परिसरात गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप
-
अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा फटका द्राक्ष बागायतदारांना
नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांना अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा फटका बसलाय. गेल्यावर्षी पेक्षा द्राक्ष निर्यातीत 50% घट, निर्यात होणारे द्राक्ष काही प्रमाणात अडकून पडले. आखाती देशातील परिस्थितीमुळे यंदा केवळ 65 ते 70 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात
-
अहिल्यानगरमध्ये युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा
आखाती देशातील युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा. घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. राहता तालुक्यातील साकुरीमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत सिलेंडर वाटप. तासनतास रांगेत उभे राहून सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची धडपड.
-
जागतिक संघर्षाचे सावट, पंतप्रधानांकडून मंत्रालयांना ‘अलर्ट’
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय नागरिकांवर परिणाम होऊ देऊ नका… मंत्रालये आणि विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवा… केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींकडून सर्व मंत्रालयांना सतर्क राहण्याचे आदेश
-
मस्तवाल व्यक्तीकडून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
सोलापुरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या मस्तवाल व्यक्तीकडून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण. मारहाणीची संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीय. गेट का उघडला नाही या शुल्लक कारणावरून मध्यरात्री दोनच्या सुमरास मारहाण. सोलापुरातील विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंट या उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार. या प्रकरणी आरोपी प्रसाद व्हनपरके आणि त्याच्या भाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारहाण झालेला सुरक्षारक्षक शशिकांत मोरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आलाय .
-
पोलिसांच्या उपस्थितीत सिलेंडर वाटप
घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. राहाता तालुक्यातील साकुरी येथे पोलिसांच्या उपस्थितीत सिलेंडर वाटप. तासनतास रांगेत उभे राहून सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची धडपड. रांगेतून पुढे जाण्यावरून ग्राहकांमध्ये वाद-विवाद. गॅस वितरकांनाही ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागतय.
-
इराण-इस्रायल युद्धामुळे पेट्रोल पंपावर रांगा
इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण होईल या भीतीपोटी आता नागरिक व वाहनचालक पेट्रोल पंपावर रांगा लावत आहेत. मात्र सध्या इंधन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा इंधन कंपन्यांकडून केला जातोय.मनमाड पानेवाडी नजीक असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपनीतून राज्यातील विविध जिल्ह्यात सुरळीत इंधन पुरवठा सुरू असल्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
-
जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ
जिल्हाधिकारी बैठक घेत असलेल्या सभागृहात कार्यकर्त्यांनी घुसण्याचा केला प्रयत्न. सभागृहात जाण्यापासून रोखल्याने कार्यकर्त्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न. अंगावर पेट्रोल ओतून घेत कार्यकर्त्यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा केला प्रयत्न. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ, आंदोलनामुळे जिल्हाधिकारी यांचा पारा चढला. आंदोलन व माध्यम प्रतिनिधींना जिल्हाधिकारी यांनी काढले केबिनच्या बाहेर.
-
आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ
जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ. चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 100 रुपयांची किरकोळ वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 65 हजार 418 रुपयांवर पोहोचले. तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 82 हजार 220 रुपयांवर आले.
-
बीडच्या पाटोदा परिसरात 10 वी विज्ञान विषयाचा पेपर फुटला
बीडच्या पाटोदा परिसरात दहावीची परीक्षा सुरू असतानाच आजच्या विज्ञान या विषयाच्या सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
अनेकांकडे ही प्रश्नपत्रिका गेली असून पेपर नेमका कोणी फोडला आणि कुठे फुटला याबाबतची माहिती मिळालेली नाही. एका परीक्षा केंद्रांवर अनेकांकडे या प्रश्नपत्रिकेसोबत संपूर्ण पेपरच्या उत्तराच्या झेरॉक्स असल्याचे आढळून आले आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली . पक्षाच्या अंगीकृत संघटनांच्या नेत्यांची ही बैठक होत आहे.
-
जालन्यातील लोहपोलाद उद्योगाला आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका जालन्यातील लोहपोलाद उद्योगाला बसला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये प्रति टन मागे 5 ते 6 हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. 27 तारखेला स्टीलचा भाव 56 हजार 500 रुपये होता. तर सद्यस्थितीला स्टील चा भाव 61500 रुपयांवर पोहोचला आहे,
आखाती देशांमधून लोहपोलाद उद्योगासाठी कच्चामाल येत असल्याची माहिती असून युद्ध जर लांबलं तर लोहपोलादामध्ये अजून भाव वाढ होण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तवली आहे.
-
सरकारला युद्धाचं गांभीर्य कमी दिसतंय – अमित देशमुख यांची टीका
युद्धामुळे गॅसचा तुटवडा आहे हे सरकारला मान्य करावं लागेल, पण सरकारला युद्धाचं गांभीर्य कमी दिसतंय अशी टीका अमित देशमुख यांनी केली आहे.
लोकं मुंबई , पुणे, नवी मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत, आम्हाला गॅस मिळत नाही अशी तक्रार करत आहेत. सामुद्रधूनी बंद झाली तर तेल पुरवठा आणि गॅस पुरवठादार यांना फटका बसणार. ही परिस्थिती आणखी जास्त चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली. -
नाशिक शहरातील गरवारे परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक
नाशिक शहरातील गरवारे परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक करत शिवीगाळ करण्यात आली. अनधिकृत व्यावसायिकावर कारवाई केल्याने महापालिकेच्या पथकावर दगडफेक झाली, तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. अतिक्रमण विभाग प्रमुखांच्या फिर्यादीनंतर दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे अनुषंगाने – नाशिक शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे .
-
सोलापूर – देशभरात गॅसच्या तुटवड्यानंतर काँग्रेसकडून तिरडी आंदोलन
सोलापूर – देशभरात गॅसच्या तुटवड्यानंतर काँग्रेसकडून तिरडी आंदोलन. सोलापूर काँग्रेसच्यातर्फे गॅस सिलेंडरची तिरडी काढत अनोखे आंदोलन करण्यात आलं. गॅस तुटवड्यावरून काँग्रेसची आक्रमक भूमिका घेतली असून तिरडीवर गॅस सिलेंडर ठेवत त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.
-
साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना अॅक्शन मोडवर
यवतमाळ: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरधारकांना तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून पाच दिवसांपासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद आहे. काळाबाजार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 16 पथकांची निर्मिती करण्यात आली असून अशा परिस्थितीत जिल्ह्यात कोणी काळाबाजार करताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
-
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रात नियमित गॅस पुरवठा सुरु
पंढरपूर- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रात नियमित गॅस पुरवठा सुरु आहे. कोणतीही अडचण नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि गॅस एजन्सी यांची बैठक झाली. बैठकीत अन्नछत्रात अन्न शिजवण्यासाठी गॅसची कमतरता भासणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. भविष्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे जर गॅसचा तुटवडा जाणवला तर अन्नछत्रात अन्न शिजवण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा म्हणजे चुलीवर आणि डिझेल शेगडीच्या माध्यमातून अन्न शिजवलं जाणार. पंढरपुरात येणारा विठू भक्त उपाशी राहणार नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र अविरत सुरू राहणार, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
-
जळगावात बी. जे. मार्केट भारत गॅस एजन्सीच्या केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी
जळगावात बी. जे. मार्केट भारत गॅस एजन्सीच्या केंद्रावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. ऑनलाइन बुकिंग होत नाही, तसंच बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. तक्रार करण्यासाठी आल्यावर एजन्सीमधील कर्मचारी दाद देत नसल्याचादेखील नागरिकांचा आरोप आहे.
युद्ध सुरू असल्यामुळे भविष्यात सिलेंडर मिळेल की नाही या भीतीने नागरिकांनी भारत गॅस एजन्सीच्या केंद्रावर गर्दी केली आहे. महिनाभरापूर्वी बुकिंग करून देखील सिलेंडर मिळणार नसेल तर घरात स्वयंपाक व इतर काम कशी करायची? असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
-
सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा
सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर गॅस सिलेंडर घेण्यासाठी लोकांची भलीमोठी रांग लागली आहे. इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवाड्याची भीती लोकांच्या मनात आहे. पुढे गॅस सिलेंडर मिळणार की नाही या भीतीने ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.
-
चाळीसगाव तालुक्यातील ५० लाखांच्या विमा कटाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू
चाळीसगाव तालुक्यातील ५० लाखांच्या विमा कटाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम नोंदींपासून संशयित आरोपींचा बँक खात्यांचा तपशील तपासला जाणार आहे. विमा कंपनीचा फॉर्म कोणी भरला, यासाठी संशयितांच्या हस्ताक्षराचे नमुने पोलीस तपासणार आहेत. पीएम रजिस्टर, फोटो आणि संशयित आरोपींचे बँक व्यवहार पोलिसांच्या रडारवर, अंत्यसंस्कार कुठे झाले?, याचाही पोलीस शोध घेणार आहेत.
बनावट अपघातासाठी वापरलेल्या थार कारच्या चालकासह मोटरसायकलचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील कागदपत्रे जप्त करून हस्ताक्षरही पोलीस तपासणार आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सीकडे मोठी गर्दी
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सीकडे मोठी गर्दी झाली आहे. सिडको बस स्टँड परिसरातील भारत गॅस एजन्सीजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. गॅस सिलेंडर एप्लीकेशनवर बुकिंग होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गॅस बुकिंग करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.
-
अमरावती शहरातील रुक्मिणी नगर मधील गॅस एजन्सीवर सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी….
अमरावती शहरातील रुक्मिणी नगर मधील गॅस एजन्सीवर सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कॉल वर सिलेंडर बुकिंग होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. व्हाट्सअपवर बुकिंग करण्याच्या सूचना परंतु व्हाट्सअप नंबरच ग्राहकांकडे नाही. एजन्सीमध्ये आल्यानंतर व्हाट्सअप वर बुकिंग केली जाते आणि नंतरच सिलेंडर दिले जाते.
-
आखाती देशातील तणावाचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील गॅस पुरवठ्यावर
आखाती देशातील तणावाचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यात गॅस पुरवठ्यावर खबरदारी घेतली जात आहे. सिलेंडर घेतल्यानंतर 30 दिवसांनीच पुढील गॅस बुकिंग नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झालीये. संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी गॅस वितरकांकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. व्यवसायीक सिलेंडर कंपनीकडून पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. सिलेंडर बुकिंग केल्यास एक दोन दिवसात घरपोच येत आहे.
-
कल्याण पश्चिम बापगावातील आगीचा धूर कल्याणभर
कल्याण पश्चिम बापगावातील आगीचा धूर कल्याणभर पसरला आहे. आग नियंत्रणात आली आहे, पण धुराचे साम्राज्य कायम आहे. खडकपाडा–साई चौक परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत ..श्वास घेण्यास नागरिकांना त्रास होत आहे.
-
जळगावच्या एरंडोल शहरात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस..
जळगावच्या एरंडोल शहरात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर एरंडोल शहरातील अमळनेर नाका परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झालेला. संतप्त नागरिकांनी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन वाहतूक रोखून धरल्याने महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.. अटकेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एरंडोल शहरातील नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले…
-
वडवणी तालुक्यातील पुसरा येथे शेतात मेंढ्या गेल्याने दोघांना काठीने अमानुष मारहाण
बीडच्या वडवणी तालुक्यातील पुसरा येथे मंगळवारी दुपारी एका शेतकऱ्याच्या शेतात मेंढ्या गेल्याने वाद झाला. यानंतर दोन व्यक्तींनी निवृत्ती बिटे आणि लहु बिटे यांना काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर वडवणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.
-
आखाती देशांतील युद्धाचा सोलापूर बाजार समितीला फटका; कांद्याची आवक घटली
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर दिसून येत आहे. या युद्धामुळे कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी स्थानिक बाजार समितीतील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. आवक कमी होऊनही बाजारभावात वाढ न झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सध्या मिळणाऱ्या दरातून कांद्याचा किमान उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने कांद्याला योग्य हमीभाव जाहीर करावा आणि उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी सोलापूरच्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
नाशिकमध्ये एलपीजीचा तीव्र तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा इंधन पुरवठ्यावर परिणाम
आखाती देशांतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता नाशिकच्या इंधन बाजारपेठेवर दिसून येत आहे. शहरात ऑटो एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, एलपीजीचे दर प्रति लिटर ७४.९५ रुपयांवर पोहोचले आहेत. गॅस उपलब्ध नसल्याने शहरातील अनेक पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक रिक्षाचालकांना तासनतास वाट पाहावी लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, काही पंप चालकांनी पुरवठा विस्कळीत असल्याने ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करणारे फलक लावले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या संकटामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने ही टंचाई निर्माण झाली असून, याचा मोठा फटका शहरातील रिक्षा वाहतुकीला बसत आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून ऑटो एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, याचा मोठा फटका रिक्षा चालकांना बसत आहे. अवघ्या तीन दिवसांत एलपीजी गॅसचे दर ६१ रुपये प्रति लिटरवरून थेट ८१ रुपयांवर पोहोचले आहेत. गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरातील तब्बल आठ एलपीजी गॅस पंप बंद पडले असून, जे पंप सुरू आहेत तिथे रिक्षांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस टंचाई आणि अवाजवी दरवाढ यामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, सरकारने या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी संतप्त रिक्षा चालकांकडून केली जात आहे.
-
अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, देशी-विदेशी पर्यटकांसह ७ वर्षीय मुलगी जखमी
जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस पार्किंग परिसरात पर्यटक असताना हा प्रकार घडला आहे. यामध्ये श्रीलंका, थायलंडसह जबलपूर येथील पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात जबलपूर येथील एक ७ वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यावर मोठी सूज आली आहे. दरम्यान, बस चालकाने प्रसंगावधान राखून पर्यटकांना खाली उतरू न देता बस सुरक्षित ठिकाणी वळवल्याने मोठा अनर्थ टळला. सर्व जखमींवर सध्या अजिंठा ग्रामीण रुग्णालय आणि स्थानिक खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
-
जळगावातील पेट्रोल पंप अपहाराप्रकरणी मोठी कारवाई, PSI सह मुलाला ३ दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव येथील पोलिसांच्या मालकीच्या ‘दक्षता’ पेट्रोल पंप अपहार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून, अटकेतील पोलीस उपनिरीक्षक (PSI) वाल्मीक वाघ आणि त्यांचा मुलगा शेखर वाघ यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पेट्रोल पंपावर १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा मोठा अपहार झाल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही काळ फरार राहिल्यानंतर पीएसआय वाल्मीक वाघ पोलिसांना शरण आले, तर त्यांच्या मुलाच्या बँक खात्याचा या गैरव्यवहारात वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे.
-
विरार लोकलमध्ये झुरळांचा सुळसुळाट; प्रवाशांनी व्हिडिओ केला व्हायरल
विरार रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून डब्यांमध्ये झुरळांचा सुळसुळाट वाढल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. काल दुपारी विरारवरून सुटलेल्या २:३८ च्या चर्चगेट लोकलमध्ये आणि १:१४ च्या विरार-अंधेरी लोकलमध्ये डब्यात झुरळे फिरत असल्याचे दिसून आले. एका जागरूक प्रवाशाने याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे. धावत्या गाडीत झुरळे अंगावर येत असल्याने महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन डब्यांची तातडीने स्वच्छता व फवारणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
-
मुंबईतील कांदिवली पोलिसांनी ई-सिगारेटविरुद्ध मोठी कारवाई
पोलिसांनी लाखो रुपयांच्या ई-सिगारेटसह दोन आरोपींना अटक केली. मुंबईतील कांदिवली पोलिसांनी ई-सिगारेटविरुद्ध मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ई-सिगारेट जप्त केल्या, ज्या भारतात बंदी आहेत. रोहित उपाध्याय आणि सार्थक अग्रवाल अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.हे दोघेही कांदिवलीचे रहिवासी आहेत आणि त्यांच्याकडून भारतात बंदी असलेल्या परदेशी ब्रँडच्या लाखो रुपयांच्या ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.
-
जळगावात अमरावती येथील तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार
एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरुणासह त्याच्या कुटुंबातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती येथील ३० वर्षीय तरुणीचा मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून जळगावातील तरुणाशी ओळख झाली. या ओळखीतून तरुणाने तरुणीवर नाशिक तसेच जळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करत नंतर बळजबरीने तिचा गर्भपात केला.
-
फुल विक्रेत्यांना दादर मार्केट मध्ये सर्वोतोपरी सहकार्य मिळणार
नालासोपारा भाजपाचे आ राजन नाईक यांच्या भेटी नंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे आश्वासन. दादर रेल्वे स्थानका जवळील फेरीवल्यावर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. यात वसई तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे. त्यामुळे आ राजन नाईक यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
-
सोलापुरातील छोटे हॉटेलचालक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता
व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्याने छोट्या हॉटेल चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आम्हाला कालपासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद आहे त्यामुळे आम्हाला गॅस मिळत नाही. आम्ही छोटे हॉटेल व्यावसायिक आहोत. आमचे हॉटेल चालू राहिले तरच आमच्या घरातली चूल पेटते. आमची सरकारला विनंती आहे की सरकारने छोट्या हॉटेल व्यावसायिकांसाठी गॅस पुरवठा करावा. मोठे हॉटेल व्यवसायिक किमान जीवन जगू शकतात मात्र आमचे हातावरचे पोट आहे.
-
माढ्याच्या कुर्डूवाडी मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ‘मंथली’ कारभार चव्हाट्यावर
एएसआय आनंद जोशी यांची लाचेची मागणी करीत असलेली कथित काॅल रेकार्डीगची क्लिप व्हायरल. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुर्डूवाडी कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सहाय्यक फौजदार (ASI) आनंद जोशी यांची लाचेबाबतची काॅल रेकार्डीग ची क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरमहा ‘मंथली’ स्वरूपात १५०० रुपये देण्याबाबत उघडपणे चर्चा होत असल्याचे संवादातून समोर आले आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये कुर्डूवाडी येथील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले ए.ए.स.आय आनंद जोशी एका ढाबा -हाॅटेल चालक व्यक्तीला फोन करून ओळख पटवतात आणि त्यानंतर नियमित ‘हप्ता’ देण्याबाबत बोलताना ऐकू येताहेत
-
“डिजिटल इंडियाला कल्याण-डोंबिवलीत ब्रेक!
ऑनलाईन पेमेंट साठी तांत्रिक अडचणी येत असल्याने पालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रामध्ये जन्म मृत्यू दाखल्यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा बंद; करत कॅशची सक्ती. जन्म-मृत्यू दाखला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची अर्धा अर्धा तास रांगेत उभे राहिल्यानंतर कॅशसाठी धावपळ पालिकेच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त वारंवार हेलपाटे होत असल्याने नागरिक संतप्त