ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार; तर काँग्रेसचे 5 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले, महायुतीतील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
उद्धव ठाकरे गटाचे ४ आमदार आणि ३ खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना भेटले. तर काँग्रेसचे 5 आमदार पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटून गेले, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडीला गळती लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे महाविकास आघाडीती शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. त्यातच आता उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा उदय सामंतांनी केला आहे.
उदय सामंत हे सध्या दावोसमध्ये आहे. यावेळी त्यांनी दावोसमधून दोन मोठ्या घडामोडी सांगितल्या आहेत. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
उदय सामंत काय म्हणाले?
तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाचे ४ आमदार आणि ३ खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना भेटले. तर काँग्रेसचे 5 आमदार पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटून गेले, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
येत्या तीन महिन्यांत उद्धव ठाकरे गटाचे 10 माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख हे शिंदे गटात प्रवेश करतील. तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारीही लवकरच शिवसेनेत सामील होतील, असा दावा उदय सामंत यांनी केला.
राहुल शेवाळेंकडूनही दावा
तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी काल मोठा दावा केला आहे. 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संर्पकात असून, ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे 23 तारखेला नेमकं काय घडणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
