आदित्य ठाकरे रात्री १२ वाजता घराबाहेर पडतात, तेव्हा त्यांचे काय धंदे असतात?; रामदास कदम यांचा सवाल
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिठी नदी प्रकल्पातील कथित अनियमिततेवरून ईडीची छापेमारी आणि आदित्य ठाकरे यांच्या रात्रीच्या हालचालींवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक खळबळजनक विधाने केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे रात्री १२ वाजता घराबाहेर पडतात, तेव्हा त्यांचे काय धंदे असतात? असा सवाल रामदास कदम यांनी विचारला.
मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात ईडीकडून छापेमारी केली जात आहे. ईडीच्या छापेमारीवरुन रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना थेट सवाल केले आहेत. आदित्य ठाकरे रात्रीच्या बारा वाजता घराच्या बाहेर पडतात, तेव्हा त्यांचे काय काय धंदे असतात. त्यामध्ये यांच्या पण नावाची चर्चा आहे, डिनो मोरिया, आदित्य पंचोली यांच्या पण नावाची चर्चा आहे. फुगा फुटेल,” असे सूचक विधान त्यांनी केले.
रामदास कदम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही गंभीर आरोप केले. मला वाटतं राहुल गांधींना फिक्सिंगच्या सवय लागली होती. ज्याला कावीळ होते ना त्याला दुनिया पिवळी दिसते. हवेत तलवार चालवण्यापेक्षा पुरावे द्या ना,” असे आव्हानही त्यांनी दिले.
मी मंत्रिमंडळात नाही
एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल विचारले असता, रामदास कदम यांनी सावध भूमिका घेतली. “मी आज सांगू शकत नाही. शिंदेसोबत बैठक होत नाही, तोपर्यंत मी सांगू शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरेंशी संबंध चांगले आहेत. त्या युतीवर मी कसं बोलू शकतो. मी बोलू शकत नाही. ” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मी मंत्रिमंडळात नाही. मी त्यावर बोलू शकत नाही. सांगू शकणार नाही. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या कोणत्याही आमदारांना निधी दिला जात नव्हता, हे सत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. पण आजचं मला माहीत नाही. मी मंत्रिमंडळात नाही,” असेही ते म्हणाले.
मुंबई ही मराठी माणसाचीच
मोठा भाऊ या संकल्पनेवर बोलताना रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “माझी भूमिका वेगळी आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच असली पाहिजे. मुंबईवर भगवा झेंडा फडकवला पाहिजे. देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून चर्चा करावी. भगवा फडकवा. लहान कोण आणि मोठा कोण यापेक्षा आम्ही सर्व एक आहोत, ही भूमिका घ्या. कमी अवधीत नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंकडे येतात. हे विसरता येत नाही. या गोष्टी फडणवीस यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत,” असेही त्यांनी अधोरेखित केले.
उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे तेच होणार. मग शिवसेना-भाजप युती तोडून आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री झालात. उद्धवजी ते महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये होते का,” असा सवाल रामदास कदम यांनी केला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांच्या विरोधात जाऊन तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात. त्यावेळेला महाराष्ट्राची जनतेचे आणि शिवसेनाप्रमुखांची आठवण झाली नाही का?” असा प्रश्न रामदासकदम यांनी केला.
दोन तलवारी कुठल्या मयानमध्ये राहणार?
राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या सध्याच्या चर्चेवरही त्यांनी टीका केली. “आता एवढी घाई लागली आहे की राज ठाकरे ला आम्ही सोबत कधी घेतात… पण ज्यावेळेला राज ठाकरेंनी हात पुढे केला होता त्यावेळी तुम्ही टाळी दिली का. त्यावेळी उद्धवजी तुमचे शब्द काय होते एक म्यान मे दो तलवार नही रहती है. आता हा दोन तलवारी कुठल्या मयानमध्ये राहणार आहे याचे उत्तर उद्धवजी तुम्हाला महाराष्ट्राचे जनतेला द्यावे लागेल,” असे आव्हानही त्यांनी दिले.
