Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : तर दोन्ही पक्ष एक करा; भाजपच्या राज्यातील बड्या नेत्याचा राज आणि उद्धव ठाकरेंना सल्ला; राजकीय वर्तुळात एकच खळबळ
राज्यात हिंदी लादण्याचा निर्णय मागे घेतल्यावर आणि ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपने या एकतेवर टीका केली असताना, सुधीर मुनगंटीवार यांनी उपरोधिकपणे दोन्ही पक्ष एक करण्याचा सल्ला दिला. ठाकरे बंधू या प्रतिक्रियेला कसे उत्तर देतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. या घटनेने महायुतीतील पक्षांमध्ये धास्ती निर्माण केली आहे.

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला, राजकीय वातावरणही पेटलं आणि अखेर फडणवीस सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. हिंदी सक्तीबद्दलचे दोन्ही जीआर रद्द करत असल्याची घोषणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात केली आणि शिवसेना, मनसेसह अनेक विरोधी पक्षांनी हा मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा विजय असल्याचे सांगितलं. याच पार्श्वभूमीवर यआज वरळीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांचा संयुक्त विजयी मेळावा होत असून तब्बल 2 दशकांनंतर उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा, एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या या एकीकरणामुळे महायुतीमधील पक्षांची धास्ती वाढली असून भाजपाकडून सातत्याने या दोन्ही बंधूंवर टीका करण्यात येत आहे.
ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही अशी भूमिका नारायण राणे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देत उपरोधिक उत्तर दिलं आहे.
‘ ते दोघे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे आमच्या शुभेच्छा आहेत. दोघे भाऊ एकत्र यावे, एकत्र रहावे. आवश्यकता असेल तर दोन्ही पक्षाचे एक पक्ष करावे..’ असा उपरोधिक टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. एकत्र येण्यावरून ठाकरे बंधूवर सातत्याने जी टीका होत आहे, त्याला आता राज आणि उद्धव आजच्या मेळाव्यातून काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.
मी चॅनलवरून ऐकलं आहे की हे दोन्ही बंधू सोबत आले तर आपण त्यांच्यासोबत जायचं नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे. या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा यापेक्षा अशा वातावरणात राज्यात कारण नसताना गैरसमज कसे पसरतील हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
जय गुजरात जय उत्तरप्रदेश म्हटल्याने आपण छोटे होतो का ?
एकनाथ शिंदेंनी काल अमित शहांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात जय गुजरातचा नारा दिल्याने त्यावर मोठं राजकारण सुरू झालं आहे. अनेकांनी शिंदेंवर टीका केली आहे. मात्र मुनगंटीवार यांनी शिंदेच्या वक्तव्यावरून फार गैरसमज पसरवायची गरज नसल्याचे म्हटले आहे.
‘यामध्ये वादंग करण्याचं कारण काय आहे.. आपण राष्ट्रगीत म्हटल्यानंतर जय म्हणतो तेव्हा भारत माता की जय म्हणत असताना गुजरातचे जय होत नाही का…? ही कोणती आपली सुपर ब्रेन आहे हे कळत नाही. सनी देओलच्या एका सिनेमामध्ये त्याला पाकिस्तान जिंदाबाद म्हणायला सांगितलं आणि तो म्हणाला… त्यामुळे कोणाला जिंदाबाद म्हणायचं मग अडचण नाहीये पण माझ्या देशाबद्दल काही गैर शब्दाचा उपयोग केला तर ते मला सहन होणार नाही. जय गुजरात, जय उत्तरप्रदेश म्हटल्याने आपण छोटे होतो का असा सवाल त्यांनी विचारला. जय महाराष्ट्र नंतर त्यांनी जय गुजरात म्हटलं एवढं संकुचित लोक मी नाही बघितले’ अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.