रविवार ठरला अपघातवार, मुंबईजवळील रस्त्यांवर मृत्यूचा तांडव, एका रात्रीत 4 बळी
महाराष्ट्रात अंबरनाथ, नवापूर आणि बुलढाणा येथे झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सहाहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे राज्याच्या रस्ते सुरक्षेची गंभीर स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघात झाला आहे. यात एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून सहा हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या या घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. अंबरनाथ, नवापूर आणि बुलढाणा या ठिकाणी हे अपघात घडले. यावेळी अपघातग्रस्त ठिकाणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अंबरनाथमध्ये दोघांचा मृत्यू
अंबरनाथ येथील आयटीआय समोर असलेल्या कल्याण-बदलापूर महामार्गावरील स्पीड ब्रेकरवर शनिवारी रात्री सुमारे 11 वाजता भीषण अपघात झाला. हा स्पीड ब्रेकर नीट दिसत नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या अपघातात पवन हमकारे (२३) आणि प्रणव बोरक्ले (१७) या मुरलीधर नगर येथील दोन तरुणांना गंभीर दुखापत झाली. पण रुग्णालयात नेणअयाआधीच त्या दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांसोबत गोंधळ घातला. यावेळी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरत-धुळे हायवेवर ट्रकची धडक
तर दुसरीकडे नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील देवळफळी भागातील उड्डाणपुलावर दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. मुरूमने भरलेला ट्रक विसरवाडीहून नवापूरकडे येत होता, तर सुरतहून धुळ्याकडे एक ट्रॉली जात असताना उड्डाणपुलावर त्यांची धडक झाली. नवापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर धोकादायक वळण असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामुळे मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकून पडला.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जेसीबी व इतर यंत्रणांच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढले. या अपघातात सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडले नाही, मात्र दोन्ही ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामुळे सुरत-धुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
बुलढाण्यात केळीचा ट्रक उलटला
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ते टुनकी रस्त्यावर टुनकी गावाजवळ रात्री केळीने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. टुनकीकडून सोनाळामार्गे आकोटकडे केळी घेऊन जाणारा हा ट्रक नियंत्रण सुटल्याने उलटला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
