Inside Stroy : राज ठाकरे आणि संजय राऊत यांचे एकमेकांना दोनवेळा फोन, काय झालं बोलणं?; राऊत यांनी सांगितलं काय घडलं ?
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीला विरोध दर्शविला आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 5 जुलै रोजी एकत्रित मोर्चा काढण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी याची घोषणा केली आहे. त्यासंदर्भात राज ठाकरेंशी काय बोलणं झालं हे त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्षांकडून एकत्र मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! असे ट्विट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मोर्चाची मोठी घोषणा केली. येत्या 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या या मोर्चात उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसण्याची शक्यता असून त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. आज सकाळी संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे माध्यमांशी संवाद साधला असता चर्चेचा विषय अर्थातच हा मोर्चा होता.
हिंदी सक्तीविरोधात काल राज ठाकरे यांनी 5 जुलैला मोर्चाची तर 7 जुलै रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या एल्गाराची घोषणा केली होती. मात्र आता दोन्ही बंधू मराठीसाठी एकत्र येणार असून त्यांचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊतांना अनेक प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी काल नेमकं काय बोलणं झालं हे सांगत यास एकत्र मोर्चामागची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले संजय राऊत ?
राज ठाकरे यांनी कडवट भूमिका मांडली, ती भूमिका उद्धव ठाकरे यांनीही मांडली. काल कृती समितीचे दीपक पवार आहेत. ते मराठी भाषेचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ७ तारखेला या समितीने सर्व मराठी भाषिकांना आंदोलनासाठी हाक दिली. मोर्चा काढण्याची त्यांची भूमिका होती. मराठीचा विषय असल्याने, मराठीवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्याने उद्धव ठाकरे यांनी कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमच्या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. आम्ही तुमच्या लढ्यात असू असं उद्धव ठाकरे म्हणाले. हा विषय तिथे संपला. मी तिथे उपस्थित होतो असं राऊत यांनी सांगितलं.
एकत्र आंदोलन झालं तर… राज ठाकरेंचं राऊतांशी काय झालं बोलणं ?
त्याचवेळी राज ठाकरे यांच्याकडे सरकारचे काही लोक गेले. काही सादरीकरण करण्यासाठी. बहुधा ते सादरीकर राज ठाकरेंना मान्य नसावं. आमची पीसी सुरू असतानाच राज ठाकरे यांनीही एका आंदोलनाची घोषणा केली. मोर्चाची घोषणा केली. ती 6 तारखेला केली. त्याची कल्पना आम्हाला नव्हती. आमच्या बैठका झाल्यावर आम्ही बाहेर पडल्यावर मला राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची भूमिका अशी आहे, उद्धव ठाकरेंनी7 तारखेला आंदोलन करण्याचं ठरवलं. मी 6 तारखेची घोषणा केली आहे. मराठी माणसांसाठीचे दोन मोर्चे एकत्र निघणं बरं दिसत नाही. एकत्र आंदोलन झालं तर त्याचा अधिक प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल, असं राज ठाकरे म्हणाल्याचं संजय राऊतांनी नमूद केलं.
मराठी माणसाचं ऐक्य दिसणं महत्वाचं..
मी म्हटलं ठिक आहे. उद्धव ठाकरेंशी या विषयावर चर्चा करतो. मी पुन्हा मातोश्रीत गेलो. त्यांना राज यांची भूमिका सांगितली. यावर कोणतेही आढेवेढे न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाचं ऐक्य दिसणं महत्त्वाचं आहे. मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याचं असं काही नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे. पण आपण ७ तारीख यासाठी ठरवली की ६ तारखेला आषाढी एकादशी आहे. रविवारी. राज्यभरात आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसापर्यंत पोहोचवणं कठिण जाईल. म्हणून 7 तारीख घेतली. एकत्र आंदोलन करणार असू तर काही अडचण नाही. त्यांच्याशी चर्चा करू. ७ तारखेला त्यांनी आमच्या मोर्चात यावं किंवा ५ तारखेला एकत्र आंदोलन करावं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावर मी परत राज ठाकरेंना फोन केला. त्यांच्याशी चर्चा केल्याच संजय राऊतांनी सांगितलं.
मराठी माणसात कोणतीही फूट नाही
मी त्यांना उद्धव ठाकरे काय म्हणाले सांगितलं. त्याला राज ठाकरेंनी तात्काळ होकार दिला. त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. हा मोर्चा 5 तारखेला करू आणि त्यात आम्ही सहभागी होऊ, असं राज ठाकरे म्हणाले. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही. मराठी भाषिक म्हणून आपण सहभागी होऊ. त्याला उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. 7 तारखेला शिवसेनेचं आणि 6 तारखेला राज ठाकरे यांचं आंदोलन होणार नाही. त्याऐवजी 5 तारखेला मोर्चा निघणार आहे. 5 तारखेला सकाळी 10ची वेळ सोयीची नाहीये. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू. कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात चर्चा करू. सकाळी 10 ही वेळ सोयीची नाही. लोक लांबून येतात. त्यामुळे वेळ बदलली जाईल. त्या संदर्भात राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलू. जागेचं नियोजन करू. मराठी आणि मराठी माणसावर आक्रमण सुरू असताना आम्ही निर्णय घेताना एकत्र राहू. मराठी माणसात कोणतीही फूट नाही. आम्ही सर्व सोबत आहोत असं संजय राऊत म्हणाले.
