सुविधा आहेत पण ऑक्सिजनची मर्यादा! कोरोना संकटात जबाबदारीने वागण्याची गरज, मुख्यमंत्र्याचे जनतेला आवाहन

ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे वागणे गरजेचे आहे. जगभरातील देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटू आहे, आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. 

सुविधा आहेत पण ऑक्सिजनची मर्यादा! कोरोना संकटात जबाबदारीने वागण्याची गरज, मुख्यमंत्र्याचे जनतेला आवाहन
cm-uddhav-thackeray

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून युद्ध जिंकण्यासाठी आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहे. पणऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे वागणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज केले. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच अन्य अधिकारी अपस्थित होते. (maharashtra state have less oxygen available to tackle third corona wave we have to be aware said cm uddhav thackeray)

प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल टाकले पाहिजे

“आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात मग आज ही चर्चा कशासाठी? तर कारण स्पष्ट आहे. जगभरातील देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटू आहे, आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल टाकले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून ही परिषद त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपण सज्ज राहण्याची आवश्यकता

तसेच “तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानले तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्वाच्या आहेत. अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे. मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सज्ज राहण्याची आवश्यकता आहे,” असेही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रुग्णालयांनी ऑडिट करून घेण्याचे आवाहन

आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करून घ्यावे असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट

महाराष्ट्राने ज्या वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तेवढी क्वचितच एखाद्या राज्याने केली असावी. पण आजही ऑक्सिजनची आपल्याकडे कमी आहे. आपण रोज 3 हजार मे.टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. काही यंत्रसामग्री बाहेरून आणावी लागत आहे. त्यात काही वेळ जाणार आहे. त्यामुळे आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच सव्वा लाख ऑक्सिजन बेड वाढवले म्हणजे आपण सगळ्या रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकतो का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी अधिक अडचणीची ठरली

गेल्या अनुभवातून आपण काय शिकलो हे महत्वाचे आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी अधिक अडचणीची ठरली. आपली ऑक्सिजनची गरज अचानक वाढली. राज्याची ऑक्सिजनचे उत्पादन दररोज 1200 ते 1300 मे.टन असून ही गरज मागच्यावेळी 1700 ते 1800 मे.टन एवढी वाढली. इतर राज्यातून हजारो कि.मी. वरुन ऑक्सिजन आणावा लागला. त्यातून आपण ऑक्सिजनची गरज भागवली. पण त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला त्या राज्यातून ऑक्सिजन मिळत नाही. तो ऑक्सिजन ते राज्य त्यांच्या राज्यातील रुग्णांसाठी वापरतात. ही वस्तुस्थिती आहे, अशावेळी आपल्या ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे.

राज्यात 1400 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन

आज 1400 मे.टन ऑक्सिजनचे उत्पादन राज्यात होत आहे. त्यात स्टील आणि लघु उद्योगासाठी ऑक्सिजन वापरतात. औषध क्षेत्रात, लस तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मागच्यावेळी सर्वच आपण ऑक्सिजन मेडिकल कारणासाठी वापरला म्हणजे इतर गोष्टींसाठी लागणारा ऑक्सिजन आपण बंद केला. आजही 1400 मे.टन ऑक्सिजन पैकी 300 ते 350 मे. टन ऑक्सिजन आपण रुग्णांसाठी वापरत आहोत. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ येऊ नये हा आपला प्रयत्न आहे, असेदेखील ठाकरे यांनी सांगितले.

 माझे गाव, माझी जबाबदारी’ ओळखून कोरोनामुक्त गाव करा

कोरोनामुक्त गावाची संकल्पना शासनाने राबविली. मला खूप अभिमान आहे की महाराष्ट्रातील अनेक गावांनी यात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त केले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही जशी महत्वाची गोष्ट आहे, तशीच ‘माझे गाव माझी जबाबदारी’ ही गोष्ट ही महत्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन गाव कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री  ठाकरे यांनी यावेळी केले.

विक्रमी लसीकरणाबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत काल एकाच दिवसात 12 लाख नागरिकांना लसीकरण करून महाराष्ट्राने नवा विक्रम केला. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे कौतुक केले. तसेच जसजशी लस उपलब्ध होईल तसे लसीकरण गतीने करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन

आता सणवाराचे दिवस आहेत, गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढताना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे लागेल. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावे असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या :

चिपी विमानतळाला अजूनही डीजीएसएची परवानगी नाही, कागदाचं विमान उडवणार का ? नितेश राणेंची बोचरी टीका

(maharashtra state have less oxygen available to tackle third corona wave we have to be aware said cm uddhav thackeray)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI