धावपळ सुरू… उपोषणापूर्वीच मोठी घडामोड, जरांगेंची मनधरणी सुरू; थेट तहसीलदारच मैदानात
मनोज जरांगे पाटील उद्यापासून उपोषणाला बसणार असून, राज्यात उष्णतेची लाट आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. अंबडचे तहसीलदार, तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर शिष्टमंडळ जरांगेंना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

जरांगे यांचं उपोषण अत्यंत त्रासदायक ठरणारं असं असणार आहे. एकीकडे राज्यात उष्णतेची लाट आली असून उष्माघाताने आतापर्यंत 12-13 जणांचा मृत्यू झालेला आहे. प्रशासनाने नागरिकांना उन्हात न जाण्याचं आवाहन केलेलं आहे. तर दुसरीकडे आता मनोज जरांगे त्याच रखरखत्या उन्हात उपोषणाला बसणार आहेत. उपोषणाला बसताना पाण्याचा एक थेंबही घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काही वेळात अंतरवली सराटीत येऊन जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर अंबडच्या तहसीलदारांनीही जरांगे यांना उपोषण न करण्याचं आवाहन केलं आहे.
अंबडच्या तहसीलदारांनी जरांगे पाटील यांना साद घातली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांना उन्हात बसून उपोषण करण्यापासून परावृत करण्याबाबत मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही तहसीलदारांनी पत्र लिहिलं आहे. आरोग्याची आणि जीविताची सुरक्षा राखणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे तहसीलदारांनी या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, आता तहसीलदारांच्या आवाहनाला जरांगे कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
दिवसच नाही, रात्रही महत्त्वाची
मनोज जरांगे यांनी उपोषणाचा निर्धार केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, बच्चू कडू, उदय सामंत आणि प्रसाद लाड आणि मंत्री आणि आमदारांचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांना भेटणार आहे. जरांगे यांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या. त्या कुठवर आल्या, त्याची माहिती जरांगे यांना दिली जाणार आहे. काही तांत्रिक अडचणीची माहितीही जरांगे यांना दिली जाणार असून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज दिवसभर आणि रात्रीही जरांगे यांच्याशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा फक्त दिवसच नाही तर रात्रही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. विखे पाटील आल्यानंतर जरांगे हे दोन पावलं मागे जातात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बैठक सुरू…
दरम्यान, विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. त्यांच्या शिष्टमंडळाची विभागीय आयुक्तांसोबत चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने वाटप केलेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राची जरांगे पाटलांना मंत्री विखे पाटील माहिती देणार आहे. हीच माहिती विभागीय आयुक्तांकडून घेतली जाणार आहे. तसेच प्रमाणपत्र वाटपातील अडथळ्यांचीही माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे छत्रपती संभाजीनगरहून अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत.
