मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
Manoj Jarange : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. यावेळी प्रमाणपत्रांबाबत विखे पाटलांनी मोठं विधान केलं आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्टपासून उपोषणाचं हत्यार ते उपसणार आहेत. जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहून नेत्यांची धावाधाव सुरू झाली. जरांगे यांच्या भेटीसाठी आज दुपारी सरकारचं शिष्ट मंडळ अंतरवाली सराटीत दाखल झालं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. यानंतर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांची बैठक घेऊ…
जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत मुंख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांनी दखल घेतली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे पात्र लाभार्थ्यांचे दाखले रद्द होत आहेत हे बरोबर नाही. पुन्हा असा प्रकार होणार नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आहे. तसेच प्रसाद लाड यांनी याबाबत बैठक घेतली आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला त्याचे निवारण करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. आता आम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. जर काही दाखले नाकारले असतील तर समाजामध्ये संभ्रम आहे त्याबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे याचं ही यात बारीक लक्ष आहे, सरकार सकारात्मक आहे मात्र दुर्दैवाने काही निर्णय होतात. दोन-तीन दिवसात आम्ही सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊ. प्रमाणपत्रांबाबत दोन तीन दिवसांत अधिकाऱ्यांना आदेश देऊ. त्रुटी दूर करू.’
प्रमाणपत्रांबाबत दोन-तीन दिवसांत…
पुढे बोलताना विखे पाटलांनी सांगितलं की, 29 तारखेच्या आंदोलनाबाबत आम्ही त्यांना विनंती केली आहे, शासनाची भूमिका मांडली आहे. मी मान्य करतो की त्यांच्या मनात चीड आहे. निस्वार्थपणे समाजासाठी त्यांचा लढा सुरू आहे. शासन म्हणून निर्णयांची अंमलबजावणी झाली पाहिजे आमची भूमिका आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे. प्रमाणपत्रांबाबत दोन तीन दिवसांत अधिकाऱ्यांना आदेश देऊ. त्रुटी दूर करू.
… तर अधिकाऱ्यांवर कारवाई करू – विखे पाटील
अधिकारी काम करत नाहीत असा आरोप जरांगे पाटलांकडून केला जात आहे. यावर बोलताना विखे पाटलांनी म्हटले की, आम्ही ते मान्य केले आहे, काही ठिकाणी दिसत नाही, काही अधिकारी काम करत नाहीत. बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही. जर अधिकारी असे करत असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, एक तर त्यांना निलंबित करावा लागेल, जे नियम आहेत त्यानुसार कारवाई होईल. माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे नियमात राहून काम करा.
