मुंबईत पोहोचण्याआधीच जरांगेंपुढे मोठं संकट, थेट कोर्टात याचिका दाखल; आझाद मैदानात एन्ट्री मिळणार नाही?
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईत पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. परंतु आता त्यांना पुन्हा एका याचिकेचा सामना करावा लागणार आहे. कोणी दाखल केली ही याचिका?

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले असातानाच आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. एमी फाऊंडेशन तर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या प्रस्तावित मराठा आरक्षण आंदोलनासाठी परवानगी न देण्याचे निर्देश देण्याची मागणी यातून करण्यात आली आहे. एमी ही एक स्वयंसेवी संस्था (NGO)आहे, जी सार्वजनिक कल्याण आणि सुरक्षेच्या संरक्षणासाठी समर्पित असल्याचा दावा करते. 2025 मध्ये ही या संस्थेकडून मराठा आरक्षाणाबाबत होणाऱ्या आंदोलनाचा विरोध करत न्यायालयात दाद मागितली होती.
एमी फाऊंडेशनच्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय?
एमी फाऊंडेशनने नुकत्याच केलेल्या या याचिकेत म्हटलंय की, मुंबई शहरात, गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अशात या आंदोलनाचा परवानगी मिळाल्यास मागील वर्षी झालेल्या आंदोलनाप्रमाणे सार्वजनिक मार्ग आणि सार्वजनिक जागा बंद होऊ शकतात. असं करण्याचा कोणताही अधिकार नाही, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला गैरसोय होईल. सार्वजनिक सभा, आंदोलने आणि मिरवणुका नियम, २०२५’ हे नियम तयार करण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्या्ना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तथापि, त्यांना सर्वसामान्य जनतेला गैरसोयीत टाकण्याचा कोणताही अधिकार नाही. सार्वजनिक मार्ग आणि सार्वजनिक जागा अशा प्रकारे आणि तेही अनिश्चित काळासाठी व्यापल्या जाऊ शकत नाहीत. अनिश्चित संख्येचे लोक जेव्हा वाटेल तेव्हा आंदोलनासाठी एकत्र येऊ शकतात. त्यामुळे या आंदोलनाला परवानगी न देण्याबाबत ही याचिका करण्यात आली आहे.
दरम्यान, एमी फाऊंडेशनने दाखल केलेल्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावनणी पार पडणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला या याचिकेवरील युक्तीवादानंतर न्यायालयाकडून परवानगी मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 18वा दिवस सुरु आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. त्याचदरम्यान त्यांचा मुंबईकडे प्रवास सुरु आहे. दुसरीकडे भाजपनेही जरांगे पाटील यांना घेरलेलं पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंमत्र्यांवरील टीका आणि वापरली जाणारी भाषा यावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे अशी भाषा सहन केली जाणार नाही, असं म्हटलं आहे.
