Manoj Jarange Mumbai Morcha : जरांगे यांची बायको आणि मुली रस्त्यावर उतरल्या, पहिल्यांदाच असं होतंय; काय घडलं नेमकं?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे. त्यापूर्वी घडामोडींना वेग आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान आज अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत, लाखो मराठी बांधव मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत.
दरम्यान मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघाल्यानंतर जालन्यातील महाकाळ अंकुश नगर येथे त्यांच्या कुटुंबीयांकडून मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्यानंतर, त्यांना भेटण्यासाठी त्याचं कुटुंब महाकाळ अंकुश नगर येथे रस्त्यावर बसून असल्याचं पहायला मिळालं.
यावेळी त्यांच्या मुलीनं प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, पप्पांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, पप्पांनी ठरवलं आहे कोणतंही आंदोलन लोकशाही मार्गाने करायचं आहे, त्यामुळे ते उपोषण करत आहेत. पप्पांच्या जीवाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांच्या मुलीनं दिला आहे.
तर दुसरीकडे सरकारने आरक्षण दिलं तर उपोषणाची गरज पडणार नाही, सरकारने तात्काळ आरक्षण द्यावं. आमचं आरक्षण कायद्यात आहे. आम्ही कुटुंब म्हणून तर सोबत आहोतच पण सर्व समाजाचे लोकं जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांच्या पत्नीनं दिली आहे.
आझाद मैदानावर एक दिवसाची परवानगी
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलनासाठी केवळ एक दिवसाचीच परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आम्ही सरकारच्या सर्व नियमांचं पालन करू मात्र आंदोलन बेमुदतच होणार, जर एक दिवसांची परवानगी असेल तर एका दिवसात आरक्षण मंजूर करा अशी मागणी यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंदोलनाबाबतची सरकारची ऑर्डर वाचून त्यानंतर मी यावर बोलतो, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
