Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नेत्यांचाही पाठिंबा, ‘या’ आमदार-खासदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
मनोज जरांगे पांटील यांनी आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. जरांगेंच्या या आंदोलनाला नेत्यांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे. आज बऱ्याच आमदार आणि खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.

मनोज जरांगे पांटील यांनी आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत आहे. मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आता जरांगेंच्या या आंदोलनाला नेत्यांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे. आज बऱ्याच आमदार आणि खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे
आज सकाळी मुंबईत पोहोचताच जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली. यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे उपस्थित होते. यावेळी क्षीरसागर यांनी सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे असं विधान केलं. यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली. याआधी सोनवणे यांनी मराठा आरक्षणाबाबत लोकसभेतही आवाज उठवला होता.
संजय जाधव, ओम राजेनिंबाळकर, कैलास पाटील
परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव हेही आज मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचले होते. कारण परभणी जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यानंतर धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत असं या दोघांनी जरांगे पाटलांना सांगितले.
विजयसिंह पंडित, अभिजीत पाटील
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही आज मनोज जरांगेची आझाद मैदानावर भेट घेतली. पंडित यांनी याआधीच या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनीही आज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या सर्व नेत्यांनी जरांगे पाटलांना उघड पाठिंबा दिला.
सुरेश धस, राजेश विटेकर
आज भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मुख्यमंत्र्याशी चर्चा करून याबाबत योग्य तो तोडगा काढू असं धस यांनी यावेळी सांगितलं. परभणीतील पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनीही मनोज जरांगे पाटलांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
