…तर तुम्ही 144 लावा नाही तर 145 लावा; मस्साजोगमधून जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेला आता दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे, मात्र तरी देखील आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही, तसेच या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांसोबत आहे. इथे जर आसपास काही झालं तर ती जबाबदारी गावकऱ्यांची नाही. तुम्ही 144 लावा नाहीतर 145 लावा, तुमच्या हातात सत्ता आल्यावर तुम्ही लोकशाही मारून टाकली का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे. हत्या झाली आहे, तुम्ही म्हणता एकालाही सोडणार नाही, तुम्ही नेमकं कोणाला धरलं? ते आधी आम्हाला सांगा, जे अटक झाले आहेत , ते स्वत:हून आले आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, तुमचं सरकार असूनही कुटुंबीयांना उपोषणाला बसण्याची वेळ येतीये ही गंभीर बाब आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलून देशमुख कुटुंबीयांना वेठीस धरू शकत नाही. तुमच्या राजकीय हेतूसाठी देशमुख कुटुंबियांचा दुसऱ्यांदा बळी घेऊ नका, अजूनही चाटेचा मोबाईल सापडला नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं असतं तर बीडचं अर्ध जल भरलं असतं. महाराष्ट्रातलं पहिलं पीडित कुटुंब आहे, ज्यांनी न्यायासाठी दुसऱ्याचे उंबरठे झिजवले. सरकारने चुका केल्या, तुम्ही न्याय देऊ शकत नाही, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता देशमुख कुटुंब उपोषणाला बसल्यानं वातावरण तापण्याची शक्यता आहे.
