राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा, अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार का? एकनाथ शिंदे म्हणतात…..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज रायगडमध्ये न्हावा शेव्हा पाणीपुरवठा टप्पा 3 चं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Minister Eknath Shinde on Maharashtra budget session 2021).

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, रायगड
  • Published On - 14:49 PM, 22 Feb 2021
राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा, अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार का? एकनाथ शिंदे म्हणतात.....

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने विदर्भातील काही भागांमध्ये कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याशिवाय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांसारख्या दिग्गज नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे येत्या 1 मार्चला होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाची सावट आहे. हे अधिवेशन होईल की नाही? याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सूचक वक्तव्य केलं आहे (Minister Eknath Shinde on Maharashtra budget session 2021).

“25 फेब्रुवारीला विधिमंडळ कामकाजची बैठक आहे. अधिवेशन होऊ नये, असं सरकारचं मत नाही. मात्र, जी वस्तुस्थिती आहे, कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढतोय. ही चिंताजनक बाब आहे. याशिवाय मुख्यमंत्री जनतेच्या आणि सर्वांच्या हिताचे निर्णय घेताय त्यामुळे त्यात राजकारण आणू नये”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज रायगडमध्ये न्हावा शेव्हा पाणीपुरवठा टप्पा 3 चं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Minister Eknath Shinde on Maharashtra budget session 2021).

‘विरोधकांनी राजकारण करु नये’

“आजचा कार्यक्रम हा लोकांच्या हितासाठी असलेल्या प्रकल्पासाठी होता. मोजके लोक प्रतिनिधी या कार्यक्रमात होते. सगळे नियम येथे पाळले गेलेत. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये”, अशी रोखठोक भूमिका शिंदे यांनी मांडली.

‘पेट्रोल-डिझेल दरवाढीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत’

“पेट्रोल डिझेल दरवाढीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करायला हवे होते”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

लॉकडाऊन होणार का?

“मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आहे, लॉकडाऊन लावायची पाळी आणू नका. त्यामूळे नियम पाळा हात जोडून विनंती आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे :

मी आयोजकांना धन्यवाद देतो. कालच मी फेसबुक लाईव्हमधून प्रेमाने आणि हक्काने सुचना दिल्या होत्या. एकीकडे मी सांगतोय की सार्वजनिक कार्यक्रम करू नका आणि आज आपण हा रायगड येथील कार्यक्रम करतोय पण हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे. मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी आरोग्याचे काटेकोर नियम पळून हा कार्यक्रम आयोजित केला.

पाणी म्हणजे आयुष्य आहे, विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतोय. मेट्रोचे कोचेस देशात बनवतो आहोत , उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो मात्र पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. एकदा हे स्वीकारल्यानंतर मग आपल्या हाती असते ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू ते. तहान लागली की विहीर खणतो. पाण्याची पातळीही खूप खोल जाते आहे.

मी जव्हारला गेल्या आठवड्यात गेलो होतो, ते पूर्वी हिल स्टेशन होते आणि पुढेही आपण त्याला चांगले विकसित करणार आहोत. पण पाण्याचे दुर्भिक्ष काय असते ती भीषण वस्तुस्थिती तिथे गेल्यावर पहायला मिळते.

परवा नीती आयोगाच्या बैठकीत मी मांडले की, ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत ते करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, दुसरीकडे समुद्र किनारे आहेत पण पर्यावरणाला धोका पोहचवून केलेला विकास आपल्याला नकोय.

प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. हा जीवघेणा विकास आहे. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकसंख्येपासून दूरवर किंवा ओसाड ठिकाणी सुविधा देऊन उभारावेत. वनसंपदा का नष्ट करायची ?

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सुविधा मिळत नव्हत्या. त्या काही महिन्यात प्रदूषणाची पातळी खूप कमी झाली होती. आता परत काही दिवसांपासून हवेचे प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत.

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील पण पिण्याचे पाणी गावागावात घेऊन जाऊ शकलो नसलो तर काही अर्थ नाही. मंगळावर पाणी सापडले आहे किंवा नाही हे उत्सुकतेने आपण तपासतो पण अगोदर आपण आपल्याकडील मुलभूत सुविधा आहेत का ते पहावे.

मुंबईच्या जवळच्या या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आपण नाही केली तर भिविश्यात गंभीर समस्या निर्माण होईल. वेळेत नव्हे तर वेळेआधी हा प्रकल्प पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सजलाम सुफलाम करायचा आहे.

हेही वाचा : संजय राठोडांचा मंगळवारी वाशिम दौरा, गर्दी वाढणार?; पोहरादेवी संस्थानला पोलिसांची नोटीस