मनोज जरांगेंच्या आंदोलनावर आता तोडगा काय? पहिल्यांदाच सरकारची भूमिका समोर, राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या 19 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. दरम्यान मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास मी पुन्हा एकदा मुंबईला जाणार अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात सरकारला यश न आल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी बारा सप्टेंबर जोरी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी आपल्या मुंबई दौऱ्याच्या तारखेची घोषणा केली.
दरम्यान त्यानंतर 15 सप्टेंबरला मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे तीन अर्ज केले आहेत, मात्र तरी देखील अजूनही त्यांना परवानगी मिळालेली नाहीये. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, त्यानंतर मी एकटाच उपोषण करणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. परंतु तरी देखील जरांगे पाटील हे मुंबईला रवाना होत असताना त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव दिसून येत आहेत. मग या परिस्थितीमध्ये सरकार फक्त बघ्याची भूमिका घेणार का? असा प्रश्न यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आम्ही बघ्याची भूमिका घेत नाही आहोत, मात्र बळाचा वापर करून आम्ही हे आंदोलन दाबण्यासाठी निघालो आहोत असं काही नाहीये. आम्ही चर्चा करत आहोत, अभ्यासकांसोबत देखील चर्चा करत आहोत. चर्चेतून समाधान होईल आणि या आंदोलनावर मार्ग निघेल असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
