‘मिशन कवचकुंडल’ अभियान दिवाळीपर्यंत चालू राहणार, लसीकरणाचा वेग वाढवणार- आरोग्यमंत्री

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सोयाबीनच्या काढणीचं काम होतं. त्यामुळे मिशन कवचकुंडल अभियानाची गती मंदावली होती. त्यामुळे आता मिशन कवचकुंडल अभियान आता दिवाळीपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

'मिशन कवचकुंडल' अभियान दिवाळीपर्यंत चालू राहणार, लसीकरणाचा वेग वाढवणार- आरोग्यमंत्री
राजेश टोपे, आरोग्यमंत्री


नाशिक : कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात 70 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. तर 35 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोसही देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात एकूण साडे नऊ कोटी डोस देण्यात आल्याचं टोपेंनी सांगितलं. (Mission Kavachkundal campaign to speed up vaccination will continue till Diwali)

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सोयाबीनच्या काढणीचं काम होतं. त्यामुळे मिशन कवचकुंडल अभियानाची गती मंदावली होती. त्यामुळे आता मिशन कवचकुंडल अभियान आता दिवाळीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ज्या लोकांनी अद्याप कोरोना लस घेतली नाही, त्यांना विनंती आहे की या अभियानाला त्यांनी चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद द्यावा. तसंच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या अभियानात सहभागी व्हावं, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

‘दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता, पण काळजीचं कारण नाही’

येवला, निफाड, सिन्नर, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर तालुक्यात थोडा स्पाईक आढळून येत आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही. कोरोनाचा कुठलाही नवा व्हेरिएंट आढळून आलेला नाही, ही सगळ्यात जमेची बाजू आहे. डेल्टा व्हायरस हाच महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यावरील उपचारपद्धती आपल्याला माहिती आहे. आताच तिसऱ्या लाटेचे संकेत नाहीत. मात्र, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरी आपण काळजी घेतली आणि लसीकरण वेगवान केलं तर काळजी करण्याचं कारण नसेल, असंही टोपे म्हणाले.

‘दुसरी लाट संपली नाही पण मर्यादा आली’

दुसरी लाट संपलेली नाही पण तिला मर्यादा आली आहे. मुंबईत लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे दीड कोटीच्या शहरात काल कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. दुसरीकडे अर्थव्यवस्था सुरु राहिली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळजीपूर्वक निर्बंध शिथिल केले आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठी लस उपलब्ध आहे. लहान मुलांच्या लसीकरणाची परवानगी द्यावी, आम्ही द्यायला तयार आहोत, असंही टोपे म्हणाले.

भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम- डॉ. भारती पवार

दरम्यान, भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. काही देशात तिसरी आणि चौथी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. सध्यातरी पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसबाबत गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबत अद्याप कुठलीही मार्गदर्शक तत्वे नाहीत, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुण्यात सांगितलं होतं. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आवश्यक बाबी लवकरच पूर्ण केल्या जातील, असं पवार म्हणाल्या.

कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना दिवाळीपूर्वी शिथिलता देण्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्याबाबत टाक्स फोर्सच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यतेबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मतं विचारात घ्यायला हवी. तज्ज्ञांकडून अद्याप तरी एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर कुठे जाण्यास परवानगी द्यावी अशा शिफारसी नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

‘खोट्या केसेस, दबावापुढे झुकणार नाही, महाविकास आघाडी कारवायांना सडेतोड उत्तर देणार’, मलिकांचा दावा

मुंबई महापालिकेच्या 82 हजार कोटींच्या ठेवी अभासी! प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत खळखळाट, काँग्रेसचा दावा

Mission Kavachkundal campaign to speed up vaccination will continue till Diwali

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI