मुंबई महापालिकांच्या निवडणुकीबद्दल आमदाराचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, मोठी मागणी करत म्हणाला…
गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या निवडणुका घ्या, अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच आता समाजवादी पक्षाच्या एका आमदाराने निवडणुकांबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.

Rais Shaikh Letter to Devendra Fadnavis : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांसह विविध कारणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या निवडणुका घ्या, अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच आता समाजवादी पक्षाच्या एका आमदाराने निवडणुकांबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यात मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्च 2025 पूर्वी घ्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिका 7 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवटीत आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय प्रदीर्घ काळ चालणे, हे भारतीय लोकशाहीसाठी मारक आहेत, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
रईस शेख यांनी लिहिलेल्या पत्रात काय?
मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. येत्या ७ मार्चला महानगरपालिकेवरच्या प्रशासकीय कारभाराला तीन वर्षे पूर्ण होतील. देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय प्रदीर्घ काळ चालणे भारतीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद नाही.
राज्यातील 29 महानगरपालिका, 228 नगरपरिषदा, 29 नगरपंचायती, 26 जिल्हा परिषदा, 289 पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. महायुतीचे सरकार स्थिरस्थावर झाले आहे. आपल्या हाती राज्याची सूत्र आहेत. आपण गतिमान कारभार करणारे राज्यकर्ते आहात. तरी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील प्रलंबित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ७ मार्चपूर्वी घेण्यात याव्यात, अशी लोकप्रतिनिधी या नात्याने माझी मागणी आहे, असे रईस शेख यांनी पत्रात म्हटले आहे.
