जिथे कार्यकर्ते भिडले, झाला जोरदार राडा; त्याच आमदाराने पुन्हा हाकेंना डिवचलं, वातावरण तापणार? त्या बॅनरची जोरदार चर्चा
मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवरून गेवराईत जोरदार राडा झाला होता, हाके आणि पंडित समर्थक आपसात भिडल्याचं पहायला मिळालं, आता पुन्हा एकदा बॅनर लावण्यात आले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलनाची हाक दिली होती. मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईत आंदोलन देखील केलं, अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान आंदोलनापूर्वी आणि त्यानंतर आताही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल सुरू आहे.
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला होता, मनोज जरांगे पाटील यांना काही आमदार रसद पुरवत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. बीडच्या गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराईत लावलेल्या बॅनरवरून देखील वाद निर्माण झाला होता, या बॅनरबाबत हाके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हाके आणि पंडित समर्थक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं, त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार विजयसिंह पडिंत यांनी गेवराई मतदारसंघात बॅनर लावले आहेत.
आमदार विजयसिंह पंडित यांनी यापुर्वी जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाच्या समर्थनार्थ चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर लावले होते. लक्ष्मण हाके यांनी या बॅनरवरून आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर निशाणा साधताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये गेवराईत जोरदार राडा झाला होता.
यानंतर आता मराठ्यांचा ऐतिहासिक महाविजय, महायुती सरकारचे आभार अशा आशयाचे बॅनर, फ्लेक्स आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडून पुन्हा एकदा गेवराईमध्ये लावण्यात आले आहेत. या बॅनर आणि फ्लेक्सची सध्या बीड जिल्ह्यात चर्चा होत आहे. बॅनर लागल्यानंतर आज पुन्हा लक्ष्मण हाके हे गेवराईत एका बैठकीसाठी येत आहेत. दरम्यान लक्ष्मण हाके यावरून काही बोलले तर पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे.
वातावरण तापणार?
दरम्यान विजयसिंह पंडित यांनी लावलेल्या या बॅनरची आता जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. हाके यांनी आधीच पंडित यांच्यावर हल्लाबोल केला होता, त्यानंतर ते आज पुन्हा एकदा गेवराईमध्ये येणार आहेत, त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
