त्या भेटीनेच दिले होते संकेत, अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी? राष्ट्रवादीत तटकरेंचंच ‘वजन’
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. महायुतीची रायगडची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याचे समोर आले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे रायगडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. अशातच आता महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीत भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढवणार असल्याचे समोर आले आहे. हा फॉर्मुला समोर आल्यानंतर आता रायगडची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याचेही समोकर आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे रायगडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय
आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादीची सुतारवाडी येथे बैठक पार पडली. या बैठकीसाठी कोकणातील पक्षाचे अनेक कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यावेळी महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. आता लवकरच ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते आदिती तटकरे यांच्यासह अर्ज भरण्यासाठी रवाना झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनिकेत तटकरेंनी घेतली होती एकनाथ शिंदेंची भेट
रायगडच्या जागेबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. रायगडमधील उमेदवारीसाठी अनिकेत तटकरे यांनी काल शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. तसेच तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर आता पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर अनिकेत तटकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले असल्याचे समोर आहे.
शिवसेनेकडून आधीच अर्ज दाखल
समोर आलेल्या माहितीनुसार, रायगडच्या जागेवर शिवसेनेनेही दावा केला होता. कारण या जागेसाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र अनिकेत तटकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यानंतर आता ते अर्ज दाखल करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे आता जुईली दळवी यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा लागण्याची शक्यता आहे.