
“महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले किंवा त्यांना रद्द करायला भाग पाडलं. त्यासाठी महाराष्ट्राच, मराठी जनतेचं मी अभिनंदन करीन. सर्वबाजूनी जो रेटा आला आणि त्यातून सरकारला गरज नसताना हा विषय आला होता. परंतु तो विषय रद्द झाला, त्याबद्दल मी महाराष्ट्राचे, मराठी जनाचे आभार मानीन. पण त्याबरोबर साहित्यिक, मोजके कलावंत त्याच बरोबर मराठी वर्तामानपत्राचे, मराठी चॅनल्सचे संपादक यांचे आभार मानतो” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. काल देवेंद्र फडणवीस सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केला. या त्रिभाषा सूत्रामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा समावेश करण्यात आला होता. यावर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेत जोरदार विरोध केला होता. अखेर सरकारला हा जीआर रद्द करावा लागला. यावर आज राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“हा विषय जेव्हा निघाला, हा विषय क्रेडीटचा नाहीय. हा विषय निघाला, तेव्हा सर्वप्रथम आम्ही विरोध केला. मागे तीन पत्र तुम्हाला मी वाचून दाखवली होती. ती पत्र गेल्यानंतर वातावरण जसजस तापायला लागलं. महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्ष त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, इतर राजकीयपक्षांनी पाठिंबा दिला. आम्ही मोर्चाची 6 तारीख जाहीर केली होती. नंतर 5 तारीख जाहीर केली. हा जर मोर्चा जर निघाला असता, तर तो भूतो न भविष्यती असा मोर्चा निघाला असता, 70-75 वर्षाची जी लोकं आहेत, त्यांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. तसं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं असतं. मराठी ताकद काय, सरकारला कळली असती. महाराष्ट्रात मराठी माणसू एकवटला की काय होतं हे कळलं. पुन्हा सरकार अशा भानगडीत जाणार नाही अशी आशा बाळगतो” असं राज ठाकरे म्हणाले.
‘तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही’
“त्यादिवशी दादा भुसे माझ्याकडे आलेले. मला सांगितलं, तुम्ही ऐकून घ्या. मी त्यांना म्हटलं, तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही. या विषयात कुठली तडजोड होणार नाही. हे स्लो पॉयजनिंग आहे. हे महाराष्ट्राच्या नशिबी येणार. बाकी कुठली राज्य हे ऐकणार नाहीत. सरकारने हा प्रयत्न करुन पाहिला, त्यांच्या अंगाशी आलं” असं राज ठाकरे म्हणाले.