डोंबिवलीत मनसे संपणार? भाजप नेत्याचे वक्तव्याने राज ठाकरेंची झोप उडाली, म्हणाला सर्व मित्र एकत्र
कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का बसला असून शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमचा एक मोठा मित्रही लवकरच सोबत असेल असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी काल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे डोंबिवलीत मनसेला खिंडार पडले आहे. यावेळी मनोज घरत यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला. मात्र या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. आमचा एक मोठा मित्र देखील लवकरच आमच्यासोबत असेल, असे विधान रवींद्र चव्हाण यांनी केले. या विधानाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
भाजपमध्ये प्रवेश करत अधिकृत शिक्कामोर्तब
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये मनोज घरत यांनी भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. मनसेकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही लढत चुरशीची होईल असे वाटत होते. मात्र, ऐनवेळी वरिष्ठ पातळीवरून झालेल्या हालचालींनंतर घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मनोज घरत यांनी माघार घेतल्याने महेश पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. तेव्हापासूनच घरत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर मनोज घरत यांनी काल गोपीनाथ चौकातील मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश करत अधिकृत शिक्कामोर्तब केले.
योग्य वेळ आणि संधीची वाट पाहतोय
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी मनोज घरत यांचे पक्षात स्वागत करत अत्यंत सूचक वक्तव्य केले. राजकारणात चर्चा अनेक असतात, पण मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते. मनोज आणि मी अनेक वर्षांचे मित्र आहोत. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे. पण हे तर केवळ चित्र आहे, खरा सिनेमा अजून बाकी आहे. मला खात्री आहे की, आमचा एक मोठा मित्र देखील लवकरच आमच्यासोबत असेल. तो योग्य वेळ आणि संधीची वाट पाहत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा सर्व मित्र एकाच छताखाली असतील, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
राजकीय तर्कवितर्कांना उधाण
रवींद्र चव्हाण यांच्या या विधानानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मनसेचा असा कोणता मोठा नेता आहे जो भाजपच्या संपर्कात आहे, रवींद्र चव्हाण यांचा रोख मनसेच्या राज्यस्तरीय नेत्याकडे आहे की स्थानिक वजनदार नेत्याकडे, याबाबत तर्क लढवले जात आहेत.
दरम्यान मनोज घरत यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. डोंबिवली पश्चिम भागात घरत यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांमुळे मनसेला तिथे मोठे भगदाड पडले आहे. तर दुसरीकडे, महायुतीमधील समन्वय वाढवण्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. तरी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने मनसे छावणीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
