Devendra Fadanvis : राज ठाकरेंसोबत युती का नाही केली? देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा; स्पष्टच म्हणाले…
राज ठाकरेंशी युती न करण्यामागचं कारण देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. 'आम्ही तीन पक्ष एकत्र असल्याने राज ठाकरेंना आमच्याकडे जागा नाही,' असं ते म्हणाले. प्रखर हिंदुत्व सोडून राज ठाकरेंनी जुनी मराठी माणसाची भूमिका घेतल्याने वैचारिक मतभेद झाल्याचंही फडणवीसांनी नमूद केलं. तसेच, उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीमुळे राज ठाकरेंचं सर्वाधिक नुकसान होईल, असा दावाही त्यांनी केला.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीला अवघे तीन दिवस उरले आहेत. उद्या निवडणुकीचा प्रचार थांबेल. त्यापूर्वीच सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार करण्यावर भर दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही या प्रचारावर भर दिला आहे. या प्रचारांमध्ये त्यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच अनेक नव्या गोष्टीही मतदारांसमोर मांडल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी टीव्ही9 मराठीला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्यासोबत युती का झाली नाही? यावर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत तुम्ही युती का नाही केली? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देत उद्धव ठाकरे यांच्या मिर्च्या झोंबल्याच्या आरोपातील हवाच काढून टाकली. सध्या राज्यात आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. त्यामुळे आमच्याकडे स्पेस नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंना आम्ही सामावून घेऊ शकलो नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे मित्रच राहतील
मागच्यावेळी आमची राज ठाकरेंसोबत युती झाली होती. राज ठाकरे जेव्हा आले होते, तेव्हा त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला होता. आता त्यांनी हिंदुत्व सोडून दिलं आहे. त्यांनी जुनीच भूमिका घेतली आहे. ते मराठी माणसाबद्दल बोलले तर हरकत नाही. पण रिक्षावाल्यांना मार, टॅक्सीवाल्यांना मार हे काही आम्हाला जमणार नाही. त्यामुळे त्यांचं आणि आमचं जमलं नाही. ते काही आमचे शत्रू नाहीत. ते पुढेही मित्रच राहतील. पण या निवडणुकीत त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. मी मित्र म्हणून नाही, राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या युतीचं सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांना होणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
त्यांनी उमेदवारच दिले नाही
राज्यात 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, इतरांचे का नाही? फक्त तुमचेच कसे? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिलं. आमचेच उमेदवार बिनविरोध आलेले नाही. इस्लाम पार्टीचाही एक आला आहे. एक अपक्षही आला आहे. अपक्षाची काय ताकद असते? हे सर्वांना माहीत आहे. तरीही तो आला. मग आमचेच बिनविरोध कसे आले? हे म्हणणं चुकीचं आहे. हे कधी घराच्या बाहेर पडत नाहीत. राज्यातील कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलंय जरा सांगा? मुंबई, नाशिक वगळता प्रचारासाठी हे दोघेही कुठे गेलेत का? मग लोक यांना कसे निवडून देतील? असा सवालही त्यांनी केला.
