Marathi Morcha: व्यापारी आहात, व्यापार करा…; आमचे बाप बनू नका, नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?
मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाने मराठी भाषेबाबत भव्य मोर्चा काढला. यावेळी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हिंदी भाषिक नागरिकांना व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनू नका असा इशारा दिला.

मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाने मराठी भाषेबाबत भव्य मोर्चा काढला. सुरुवातीला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती मात्र लोकांची गर्दी वाढल्याने पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सामील झाले होते. या मोर्चाला मनसेचे नेते संदीप देशपांडे हेही उपस्थित होते. यावेळी देशपांडे यांनी हिंदी भाषिक नागरिकांना व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनू नका असा इशारा दिला.
इथे धंदा करायला आलात तर शांतपणे धंदा करा – देशपांडे
पुढे बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसेल. 2 हजार मैलावरून इथे येऊन दादागिरी नाही करायची. हा महाराष्ट्र आहे, इथे काय होणार आणि काय नाही ते आम्ही ठरवणार, आमची मराठी माणूस ठरवणार. इथे धंदा करायला आलात तर शांतपणे धंदा करा, इथल्या राजकारणात हस्तक्षेप करु नका.’
मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही – देशपांडे
पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, ‘ज्यांना श म्हणता येत नाही त्यांनी आम्हाला शिकवायचं नाही. आम्हाला मराठी असल्याचा फक्त गर्व नाही तर माज आहे. आज आम्ही एकजुटीने तो माज दाखवला आहे. इथे येऊन माज नाही दाखवायचा, इथे फक्त माज आमचाच चालणार, बाकी सर्वांनी चड्डीत राहायचं ही शिकवण आज आपण दिली आहे. मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही. मराठी माणूस चिडला तर काय होतं हे आज सरकारने पाहिले आहे. त्यामुळे अशीच एकजूट ठेवा. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाहीत.’
मराठी लोक आता एकत्र आलेत – राजन विचारे
ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी म्हटले की, ‘मला वाटतं गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात सर्व मराठीवर प्रेम करणारी सर्व जाती धर्मातील लोक असतील, महाराष्ट्रात एकत्र आलेले आहेत. गेल्यावेळी मुंबईत मोर्चा निघणार होता. या लोकांनी मोर्चा काढू दिला नाही. आम्ही सामंजस्याचा मार्ग काढून डोममध्ये मेळावा केला. मराठी माणसाची एकजूट पहायला मिळाली. त्यानंतर हातभर फाटल्यानंतर आज त्यांना असं वाटलं की, मीरा-भाईंदरमध्ये आम्ही दादागिरी करुन मोर्चा काढू देणार नाही मात्र मोर्चा निघाला आहे.’
