घरगुती गॅसचं संकट आता मुंबईतही… ऑनलाईन नंबर लागेना, एका सिलेंडरसाठी एजन्सीबाहेरच झोपून काढली अख्खी रात्र
घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि भिवंडीत गंभीर संकट निर्माण झाले आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये अडथळे आणि इंधन पुरवठ्याच्या भीतीमुळे नागरिक एजन्सीबाहेर पहाटेपासून, तर काही ठिकाणी रात्रभर रांगेत उभे आहेत. पुरेशा साठ्याच्या दाव्यांनंतरही ग्राहक त्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. तातडीने उपाययोजनांची मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसापासून देशात घरगुती गॅसचं संकट निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगा लागल्याचं चित्र होतं. पण आता हे संकट राज्यातील ग्रामीण भागापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मुंबईतही या संकटाने धडक दिली आहे. मुंबईतही लोक पहाटे 6 वाजल्यापासूनच सिलेंडरसाठी एजन्सीबाहेर रांगा लावून आहेत. तर भिवंडीत नागरिकांनी एजन्सीच्या बाहेरच अख्खी रात्र झोपून काढली आहे. यावरून घरगुती गॅस सिलेंडरचं संकट किती गंभीर होत आहे हे दिसून येत आहे.
इराण-इस्त्रायल युद्धामुळे इंधनाचे गाड्या रोखल्या जाण्याची भीतीने तसेच ऑनलाइन बुकिंगमध्ये तांत्रिक अडथळे आणि घरपोच सेवेत दिरंगाई होत असल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत. अनेक जण कामावरून सुट्टी घेऊन सिलेंडरसाठी सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. प्रशासनाने जरी पुरेसा साठा असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सींवर भली मोठी झुंबड उडत आहे. काही ठिकाणी 8 दिवसांपासून सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मुंबईतील कुर्ला, दादर, नायगाव, कांदिवली, चारकोप इथे नागरिक रांगेत उभे असलेले दिसत आहेत. मुंबईतील दादरच्या नायगावमध्ये गॅस सिलेंडरसाठी आज सकाळी 6 वाजल्यापासून एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या.
घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. आखाती देशांतील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची भीती आणि ऑनलाइन बुकिंगमध्ये अडचणींमुळे नागरिक थेट एजन्सीवर गर्दी करत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखण्याचे आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एजन्सी बाहेर झोपून रात्र काढत सिलेंडरसाठी लावली रांग
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे गॅसचा तुटवडा भासत असून त्याचा मोठा फटका भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसत आहे. भिवंडी हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जात असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग 5 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे. मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडर उपलब्ध होत असल्याने “जे लवकर पोहोचतील त्यांनाच सिलेंडर मिळेल” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे कामगार रात्रीपासूनच रांग लावून ठेवत आहेत. एवढेच नव्हे तर सिलेंडरसाठी नंबर लावून हे कामगार जिथे जागा मिळेल तिथे झोपून रात्र काढत आहेत, जेणेकरून त्यांना सिलेंडर उपलब्ध होईल. खरं म्हणजे केवळ 40 ते 50 सिलेंडरचे वाटप होत असल्याने आपला नंबर कसा येईल यासाठी कामगार रात्रीपासूनच एजन्सीबाहेर रांगा लावत आहेत. पहाटेपर्यंत ही गर्दी वाढत जाते, मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत रांगेत उभे राहूनही सिलेंडर न मिळाल्याने कामगार वर्गात नाराजी पसरली आहे. गॅसअभावी जेवण बनवणेही कठीण झाले असून रोजच्या जगण्यावर परिणाम होत आहे. हॉटेलचे जेवण तसेच शेगडीवर अन्न शिजवणे परवडत नाही. या पार्श्वभूमीवर कामगारांनी प्रशासनाकडे 5 किलो कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रांगा कायम
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा अजूनही नागरिकांना भेडसावत असल्याचं चित्र आहे. शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात भारत गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना अक्षरशः पहाटे 5 वाजल्यापासून रांगेत उभं राहावं लागत आहे. एजन्सी सुरू होण्यापूर्वीच मोठी गर्दी होत असून नागरिक ताटकळत प्रतीक्षा करत आहेत. अनेक दिवसांपूर्वी बुकिंग करूनही वेळेत गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
ऑनलाईन नंबरच लागेना
नागपूरच्या काही भागात 12 व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सी बाहेर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडरसाठी एचपीच्या गॅस गोडाऊनबाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. ऑनलाईन नंबर लागत नसल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत.
