मराठी माणूस खतरे में है, मग 30 वर्ष तुम्ही गोट्या खेळत होतात का? फडणवीसांचा ठाकरेंना थेट सवाल
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये महायुतीची सभा पार पडली, या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली, तर दुसरीकडे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली, या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठी माणूस खतरे में है म्हणता, मग 30 वर्ष तुम्ही काय गोट्या खेळल्या का? असा थेट सवालच यावेळी ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
काल मुंबईत उद्धव ठाकरेंची सभा झाली, काल जी सभा झाली त्यात तेच अपील, तीच कारण, तेच मुद्दे. खरं म्हणजे एकनाथ शिंदेंनी सांगितलं ही मुंबई ही कुणाच्या बापाच्या बापच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकणार नाही. मराठी माणूस अडचणीत दिसतोय, खतरे में दिसतोय, तर ३० वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होतात का? असा थेट सवाल यावेळी फडणवीस यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, २५ ते ३० वर्ष सत्ता राबवली. खुर्च्या उबवल्या. तरीही मराठी माणसाची ही अवस्था असेल तर चुल्लूभर पाणी में डुब मरो. आदित्य ठाकरेंनी उद्या दिवस भरात कधीही सांगावं या आमच्याकडून शीतल गंभीर येतील, करूया चर्चा. काय सांगतात तर ही शेवटची निडवणूक आहे. मुंबईकरांसाठी ही शेवटची निवडणूक नाही, मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक नाही, आम्ही पानीपतमध्ये लढणारे आहोत. आम्ही शौर्य गाजवणारे माणसं आहोत.
मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई नाही. तुमचं अस्तित्व पणाला लागलं आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबई म्हणजे ही जनता आहे. मराठी म्हणजे ही जनता आहे. महाराष्ट्र म्हणजे ही जनता आहे. आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला आवडतं, मला प्रॉब्लेम नाही. त्यांना समजायला पाहिजे, नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली? काकांना किमान चांगली नक्कल तरी करता येते, भाषण करता येते. तुमची काय अवस्था होईल ते पाहा, असं म्हणत फडणवीस यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.
