दिवसा उकाडा, रात्री थंडी… मुंबईकरांनो, व्हा सावध.., तापमानात होतोय बदल
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वातावरणात अनेक बदल होताना दिसत असून थंडीच शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान तापमानात अचानक झालेली घट आणि कमाल तापमानात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा, अशा विषम हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत थंडी हा प्रकार सहसा कधी आढळत नाही. फास्ट सुरू असलेला फॅन थोडा स्लो केला म्हणजे आली थंडी, अशीच परिस्थिती बऱ्याच मुंबईकरांनी अनुभवली असेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वातावरणात अनेक बदल होताना दिसत असून थंडीच शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान तापमानात अचानक झालेली घट आणि कमाल तापमानात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा, अशा विषम हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये कन्फ्युजन आहे. दरम्यान, ही स्थिती पुढील एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानाच्या तुलनेत नोंदले जाणारे तापमान हे एक ते दोन अंशांनी अधिक आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी कमाल तापमानाने 32.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. याचवेळी किमान तापमानात मात्र घट झाली होती. सांताक्रूझ येथे मंगळवारी 18.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
यामुळे उकाड्यात वाढ झाली असली, तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास मात्र मुंबईकरांना गारवा जाणवत आहे. त्यातच पुढील एक दोन दिवस मुंबईत किंचित थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तरेकडील थंड वारे फक्त उत्तर व उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे मुंबईकरांना थंडीसह उकाड्याचाही अनुभव घ्यावा लागणार आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावली आहे.सध्या प्रदूषण वाढले असतानाच आता दिवसा प्रचंड उकाडा आणि पहाटे व रात्री थंडी अशा वातावरणामुळे मुंबईकरांची तब्येत बिघडली आहे. येत्या काळातही असेच वातावरण राहण्याची शक्यता असून त्यामुळे तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.