ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; शिवाजी पार्कातील आंदोलनप्रकरणी पोलिसांत 3 गुन्हे, कारण काय?
mumbai political news : ठाकरे गटाने काल शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या प्रकरणी सभा आयोजकांवर पोलिसांकडून 3 गुन्हे दाखल करण्यात आले.

मुंबईच्या दादरमधून मोठी बातमी आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काल शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या आंदोलनावेळी शिवसैनिक, आयोजक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. सभा झाल्यानंतरही आंदोलकांनी शिवाजी पार्क मैदान रिकामे केलं नव्हतं. सभेनंतरही आंदोलक, विद्यार्थी शिवाजी पार्क मैदान सोडायले तयार नव्हते. ही सभा विनापरवानगी घेतल्याचंही समोर आलं आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचे समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना परवानगी आंदोलनाचे आयोजन केल्या प्रकरणी ठाकरे गटाच्या आयोजकांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंदोलनास परवानगी नसतानाही लोकांना आंदोलन ठिकाणी जमण्यास आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आंदोलनानंतरही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दादर परिसरात ठिकठिकाणी आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ही मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिसांनी तिसरा गुन्हा दाखल केलाय. या तीनही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आंदोलकांच्या गर्दीमुळे पोलिसांची धावपळ
ठाकरे गटाने शिवाजी पार्कावर आयोजित केलेल्या सभेला आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. शिवाजी पार्कातील गर्दीमुळे पोलिसांनी आंदोलकांना मैदान खाली करण्याचं आवाहन करण्यात येतं होतं. परंतु आंदोलक शिवाजी पार्क मैदान सोडायला तयार नव्हते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं.
उद्धव ठाकरेंचा सरकावर जोरदार हल्लाबोल
शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुमची पाकिस्तानशी चर्चा करण्याची चर्चा आहे. तर सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा का करू शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.